दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२१ । वाई । वाई गुरे बाजार झोपडपट्टीतील सनी उर्फ राहुल सुरेश जाधव, सागर सुरेश जाधव, अक्षय गोरख माळी, सारंग ज्ञानेश्वर माने सर्वजण रा. गुरेबाजार झोपडपट्टी सिद्धनाथवाडी, वाई, यांच्यावर वाई पाचगणी भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल होते. या सर्वांना प्रतिबंधात्मक कारवाई करून वेळोवेळी सुधारण्याची संधी देण्यात आली होती. तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे वाई पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांच्याकडे चौघांना तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक मधुकर गुरव हवलदार प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस,पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय शिर्के यांनी या प्रस्तावाच्या सुनावणी दरम्यान पुरावेही सादर केल्याने या सर्वांना एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अजय कुमार बंन्सल यांनी शुक्रवारी सायंकाळी दिले. याच प्रमाणे सातारा शहर हद्दीतील सुरज राजू माने व तेजस शिवपालक, लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, सातारा, यांनाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. शुक्रवारी सायंकाळी याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले. वाईतील चौघांना नुकताच जामीन मिळाला असून त्यांच्यावर आज वाई पोलिस ठाण्याकडून आज तडीपरीचा आदेश बजावण्यात येईल असे समजते.वाईतील या चौघांनी शहरात अनेक घरफोड्या व दुकानातून चोऱ्या केल्या होत्या.पोलिसांनी त्यांची शहरातून धिंड काढली होती.यावेळी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, पोलीस पोलीस उप निरीक्षक कृष्णकांत पवार,सोमनाथ बल्लाळ,किरण निंबाळकर,श्रावण राठोड आदींनी यावेळच्या कारवाईत सहभाग घेतला होता.या कारवाई बद्दल बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.