स्थैर्य, नागठाणे, दि.१२: ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर अतीत (ता.सातारा) गावच्या हद्दीत दोन मालट्रक,एक आरामबस व सरकारी जीप यांच्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात चार जण जखमी झाले.अपघातग्रस्त मालट्रक महामार्गावर आडवा झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.बुधवारी पहाटे हा अपघात झाला.या अपघातांची बोरगाव पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली न्हवती.
याबाबत घटनास्थळ व हायवे हेल्पलाईनकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास कोल्हापूरहून धाग्यांचे बंडल घेऊन निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा अतीत गावच्या हद्दीत सुटला.ट्रक दुभाजकावर चढून तसाच पुढे असलेल्या ओढ्याच्या पुलाला जोरात जाऊन धडकून महामार्गावरच पलटी झाला.याचवेळी पाठीमागून येत असलेल्या खाजगी आरामबसच्या चालकाने अपघातग्रस्त ट्रक चुकविण्याचा प्रयत्न केला.
मात्र बस ट्रकला जोरात घासत गेल्याने तिचा उजव्या बाजूचा पत्रा फाटला गेला.यामध्ये आराबसमधील एक प्रवाशी महिला (नाव ,गाव समजू शकले नाही) गंभीर जखमी झाली.तर ट्रक उलटत असतानाच चालकाने जीव वाचविण्यासाठी बाहेर उडी मारली.ती उडी दुभाजकामधल्या मोकळ्या जागेतून थेट १०० फूट खाली गेल्याने ट्रकचालक प्रकाश राजाराम शिंदे (रा .हितवाड, सांगली) हाही गंभीर जखमी झाला.या दोघांनाही उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.अपघातात ट्रक चे पुढील दोन्ही चाके धडीसह निसटून बाजूला झाली होती.
दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वहातुक विस्कळीत झाली होती.यानंतर काही काळातच घटनास्थळी महामार्ग पोलीस, व हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी अपघातग्रस्त ट्रक बाजूला काढत असतानाच अन्य एक मालट्रक भरधाव वेगाने आला.यावेळी त्याने अपघातग्रस्त वहाने ओलांडत असलेल्या सरकारी जीपला पाठीमागून जोरात धडक दिली.ही जीप कराड तहसील कार्यालयाची असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली.या जीपमधील अभिजित आप्पासो रावते व मनोहर रामचंद्र चोपडे हे दोघे किरकोळ जखमी झाले.त्यांनाही तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.हा ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा घटनास्थळी होती.यानंतर पोलिसांनी महामार्गावरील वहातुक सेवारस्त्याने वळवली.
महामार्ग वहातुक पोलीस पथकाचे सपोनि आर.एस.कळके, हवालदार सुनील पोळ,प्रवीण कोळी,रुपेश कारंडे,वैभव निकम,रायसिंग घोरपडे,अरुण निकम,राजेंद्र कुंभार, हायवे हेल्पलाईन चे दस्तगिर आगा,अमित पवार,जनता क्रेनचे अब्दुल सुतार,आजीम सुतार,सोहेल सुतार व श्री अंबुलन्सचे समीर केंजळे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून जखमींना उपचारासाठी नेले.