जिल्ह्यात विविध ठिकाणी चौघांच्या आत्महत्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात आत्महत्येच्या चार घटनांची नोंद झाली आहे. कारंडवाडी, रेवलकरवाडी, सस्तेवाडी आणि बोपोर्डी येथे आत्महत्या झाल्या आहेत. यापैकी एक वयोवृध्द शेतकरी, एक महिला तर दोन पुरुष आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात आत्महत्या वाढू लागल्या आहेत. दरम्यान, यापैकी एकाच्याही आत्महत्येचे नेमके कारण काय याची माहिती पोलीस ठाण्यातून मिळू शकली नाही.

सातारा तालुक्यातील कारंडवाडी येथील तुकाराम हणमंत केंजळे (वय 45) यांनी सोमवारी सकाळी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी सातारा डायग्नोस्टीक सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा येथे मृत्यू झाला. याबाबतची खबर वैद्यकीय अधिकार्‍यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करत आहेत.

खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी येथील वयोवृध्द शेतकरी गजानन मारुती कदम (वय 72) यांनी रेवलकरवाडी येथील आरसांड नावाच्या शिवारात असणार्‍या आंब्याच्या झाडास गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवार, दि. 17 रोजी रात्री नऊ वाजण्यापूर्वी घडली आहे. याबाबतची खबर महेश गजानान कदम यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस नाईक ए. एस. गंबरे करत आहेत.

फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील सुभाष जगन्नाथ जगताप (वय 52) यांनी पत्र्याच्या खाली असलेल्या चॅनेलला दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना लक्षात आल्यानंतर गावातील लोकांनी त्यांच्या गळ्यातील दोरी काढली आणि त्यांना खाली उतरवले. यानंतर सुभाष यांचा पुतण्या अक्षय मोहन जगताप (वय 24) याने त्यांच्या शेजारीच राहणारे शंभूराज पोपटराव सस्ते यांना समवेत घेतले आणि फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात जावून याची माहिती दिली. यानंतर या घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान, ही घटना सोमवार, दि. 28 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या पूर्वी घडली असल्याचे पोलीस ठाण्यात नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कर्णे करत आहेत.

वाई तालुक्यातील बोपर्डी येथील पुष्पा महादेव यादव यांनी राहत्या घरी बेडरुमध्ये असणार्‍या लोखंडी अँगलला नायलॉनच्या रस्सीने गळफास लावून आत्महत्या केली. याची खबर सुजित महादेव यादव (वय 30, रा. बोपर्डी, ता. वाई) यांनी वाई पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद झाली आहे. ही घटना सोमवार दि. 18 रोजी रात्री साडेसहा ते साडेआठ या वेळेत घडली आहे. अधिक तपास पोलीस नाईक वायदंडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!