केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या ‘जनतेसाठी पदपथ’ स्पर्धेतील विजेत्यांमध्ये महाराष्ट्राची चार शहरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२० जानेवारी २०२२ । नवी दिल्ली ।  ‘जनतेसाठी पदपथ’ या केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्पर्धेतील विजेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि औरंगाबाद या चार शहरांचा समावेश असल्याची घोषणा मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

शहरांतील वाहन-केंद्री रस्त्यांचे लोक-केंद्री रस्त्यांमध्ये परिवर्तन करण्याच्या हेतूने वर्ष 2006 मध्ये लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरणातील शिफारसींच्या धर्तीवर 2020 पासून सुरु करण्यात आलेल्या स्मार्ट शहरे मोहिमेमध्ये सार्वजनिक जागा अधिक लोक-स्नेही बनविण्यासाठी देशातील शहरांमध्ये स्पर्धा सुरु करण्यात येतात. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी एकूण 38 शहरांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते.

‘जनतेसाठी पदपथ’ (स्ट्रीट्स फॉर पीपल) या स्पर्धेत परीक्षकांनी पुढील फेरीत प्रवेश करणाऱ्या 11 शहरांची निवड केली असून त्यांना मंत्रालयातर्फे प्रत्येकी 50 लाख रुपयांचे पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आयटीडीपी अर्थात वाहतूक आणि विकास संस्थेकडून तंत्रज्ञान विषयक मदत घेतली आहे.

 जनतेसाठी पदपथ’ स्पर्धेतील राज्यातील शहरे पुणे शहराचा बदलला चेहरा

पुणे प्रशासनाने अनेक रस्त्यांच्या, बाजूच्या मोकळ्या जागा वापरून नागरिकांसाठी सुरक्षित आणि आकर्षक मनोरंजन विभाग तयार केले. रस्त्यांच्या बाजूच्या भिंतींवर आकर्षक चित्रे काढणे, परिसरात हास्यवर्गांचे, संगीत सत्रांचे आयोजन तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची जागा निर्माण करणे अशा अनेक नव्या उपक्रमांनी रस्त्यांच्या आजूबाजूची जागा उपयोगात आणण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात हरित सेतू महायोजनेची केली आखणी

पिंपरी-चिंचवड प्रशासनाने त्यांच्या रस्ते रचनाकारांशी सल्लामसलत करून त्यांच्या शहरामधील हिरवाईच्या जागांना जोडणाऱ्या शहरव्यापी हरित सेतू महायोजनेची आखणी केली. गाड्यांच्या रस्त्यांचे विभाजन करून सायकल मार्ग आणि पदपथासाठी वेगळ्या मार्गांची निर्मिती देखील प्रायोगिक तत्वावर केली आहे. या शहरात चालणे आणि सायकल चालविणे अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सुधारणा केल्या आहेत.

औरंगाबाद शहरात सार्वजनिक जागेचा केला सुयोग्य वापर

रस्त्यांचा वापर कारसारख्या वाहनांऐवजी नागरिकांना मुक्तपणे वापरू देण्यासाठी सर्व सार्वजनिक संस्था आणि इतर भागधारकांमध्ये एकमत घडवून आणण्यात औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन यशस्वी ठरले. मोकळ्या रस्त्यांना सुशोभीत करण्यासह नागरिकांना कमी शुल्कात, रस्त्यांच्या कडेला विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच चालणाऱ्या आणि सायकल चालविणाऱ्यांसाठी रस्त्यांची उत्तम सोय करणे असे उपक्रम प्रशासनाने राबविले आहेत.

नागपूर शहरात गर्दीच्या ठिकाणाचे नियोजन

नागपूर शहरातील सीताबर्डी  आणि सक्करदरा या अत्यंत गर्दीच्या बाजारांमध्ये चालणाऱ्या लोकांसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपूर शहर प्रशासनाने रस्त्यांच्या धोरणात्मक पुनर्रचना केल्या. शहरातील रस्त्यांच्या लगत विविध रंग वापरून चित्रे, जुने टायर वापरून बसण्याची ठिकाणे तसेच टाकाऊ धातूच्या वस्तूंपासून नव्या पदपथांची सीमा आखणे यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले. यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार आणि इतर संबंधितांची मदत घेण्यात आली.

या स्पर्धेतील अन्य विजेत्या शहरांनी पुढील संकल्पना राबविल्या आहेत

दिल्लीच्या लगत असणाऱ्या गुरूग्राम शहरातील शाळांचे परिसर तसेच बाजाराची ठिकाणे केवळ पादचाऱ्यांसाठी राखीव करण्यात आले आहे. इतर राज्यांतील शहरांमध्ये उज्जैन शहराने कारमुक्त विभाग निर्माण केला, उदयपुर शहरात बस स्थानकाकडे येणाऱ्या वाहतुकीची पुनर्रचना केली, कर्नाल शहरात ओसाड जागा आणि उड्डाणपूलाखालील जागांना रंगीबेरंगी कलाकृतींनी जिवंत केले. तर कोहिमामध्ये कलाकृती प्रदर्शनासाठी वस्तूसंग्रहालयाची कल्पना राबविली.

केंद्र सरकारने ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाची घोषणा केली आहे. पहिल्या फेरीतील 11 विजेते शहरे वगळता कोणतीही स्मार्ट शहरे, राजधानीची शहरे किंवा 5 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात.

अधिक तपशीलासाठी https://smartnet.niua.org/indiastreetchallenge/ संकेतस्थळावरून माहिती घेता येईल.


Back to top button
Don`t copy text!