
दैनिक स्थैर्य । दि.०१ जानेवारी २०२२ । सातारा । पालावर ठेवलेले संसारपयोगी साहित्य आणायला आलेल्या एकावर चाकूने वार केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विनोद खटपट्या भोसले, परिवार विनोद भोसले, विनोद राज भोसले, समीर गबऱ्या भोसले (रा. बनवडी, ता. कोरेगाव, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, संकेत आनंदा काळे (मूळ रा. रेवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा. सध्या रा. मालगाव, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संकेत काळे हे गुरुवार, दि. २९ रोजी दुपारी चार वाजता सातारा तालुक्यातील मालगाव येथे पालात ठेवलेले संसारपयोगी साहित्य घेण्यासाठी दुचाकीवरुन आले होते. यावेळी विनोद खटपट्या भोसले याने संकेत यांचे तोंड व शरिरावर चाकूने वार केले. यात संकते जखमी झाले. त्याचा जाब विचारला असता परिवार विनोद भोसले, विनोद राज भोसले, समीर गबऱ्या भोसले या साऱ्यांनी संकेत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार संकते यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक फौजदार देशमाने करत आहेत.