दैनिक स्थैर्य । दि. २६ जुन २०२१ । खंडाळा । मिरजे, ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये राहत्या घरासमोर शेतात फनपाळी मारण्याच्या कारणावरून चार जणांना दगड, काठी व हाताने मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनला महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, खंडाळा तालुक्यातील मिरजे याठिकाणी हेमंत मुकुंद कडाळे हे कुटुंबियांसमवेत राहण्याकरिता आहे. गुरुवार दि. 24 जून रोजी सकाळी 10च्या दरम्यान हेमंत कडाळे हे कंपनीमधून घरी आले असता त्याठिकाणी चुलत चुलते दत्तात्रय तुळशीराम कडाळे, दिपक दत्तात्रय कडाळे, लक्ष्मी दिपक कडाळे, आकाश दिपक कडाळे हे हेमंत कडाळे यांच्या घरासमोर येत हेमंत कडाळेयांना बाहेर बोलवून घेतले. यावेळी संबंधितांनी हेमंत कडाळे यांना माळ नावाच्या शेतामध्ये फनपाळी का मारली अशी विचारणा केली. यावेळी हेमंत कडाळे यांनी हे क्षेत्र हे आमच्या मालकीचे असल्याने फनपाळी मारल्याचे सांगताच संबंधितांनी हेमंत कडाळे यांच्यासह भाऊ भूषण कडाळे, वडील मुकुंद कडाळे, आई अनिता कडाळे यांना दगड, काठी व हाताने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी हेमंत कडाळे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय कडाळे, दीपक कडाळे, लक्ष्मी कडाळे, आकाश कडाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत शिरवळ पोलिसांनी संबंधितांना अटक करीत खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे हे करीत आहेत.