दैनिक स्थैर्य | दि. १६ जून २०२३ | वाई |
धोम-वाई खून खटल्यात संतोष पोळ याने स्वतः ज्योती मांढरेचा तब्बल साडेचार तास उलट तपास घेतला. त्यात भुलीच्या इंजेक्शन, त्यासाठीच्या सुईंचे प्रमाण याबाबत तिला बरेच उलट-सुलट प्रश्न विचारले. तिने आजपर्यंत चुकीची माहिती पोलिसांना दिल्याचे मांढरेच्या उलट तपासणीत न्यायालयासमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न संतोष पोळ याने केला. उलट तपास बाकी असल्याचे सांगत पुढील तारीख घेण्यात आली.
धोम-वाई खून खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस.जी. नंदीमठ यांच्या न्यायालयात सुरू आहे. माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा उलट तपास बुधवारी पुन्हा पुढे सुरू झाला. सुनावणीसाठी सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम हे वाई न्यायालयात आले होते. संतोष पोळ यालाही बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी जिल्हा सरकारी वकील मिलिंद ओक न्यायालयात उपस्थित होते.
या खून खटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिचा उलट तपास प्रमुख आरोपी असलेल्या संतोष पोळ घेत आहे. आज त्याने भुलीची कोणत्या कंपनीची इंजेक्शन या खून प्रकरणात वापरली होती, यासाठीच्या कोणत्या कंपनीच्या सुईंचा वापर करण्यात आला, आदी अनेक उलट-सुलट प्रश्न विचारले. काही प्रश्नांना माहीत असल्याचे व माहिती नसल्याचे उत्तरे दिली. भुलीची जी इंजेक्शन दिली असे सांगितले आहेस, ती इंजेक्शन कितीतरी वर्षांपूर्वी बंद झाली असल्याचे तुला माहिती आहे का,असा उलट प्रश्नही त्याने ज्योती मांढरेला विचारला. याबाबत जास्त माहिती नसल्याचे तिने सांगितले. मुलीच्या इंजेक्शनमध्ये किती मिलीग्रॅम औषध घेतले होते, याबाबतही त्याने तिच्याकडे विचारणा केली. भुलीचे इंजेक्शन वापरण्याचे प्रमाण किती असते, अशा आशयाचे प्रश्न यावेळी ज्योतीला विचारण्यात आले.
सकाळच्या सत्रात न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. ज्योती मांढरेची प्रकृती ठीक नसल्यामुळे व तिला मधुमेह असल्याने चक्कर येत असल्याचे तिने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने सकाळच्या सत्रात सुनावणी केली आणि दि. १ जुलै रोजी पुढील सुनावणी नेमली आहे. त्यादिवशी पुन्हा ज्योती मांढरेचा उलट तपास पुढे सुरू राहणार आहे. न्यायालयात सुनावणी ऐकण्यासाठी वकिलांनी गर्दी केली होती. न्यायालय परिसरात संतोष पोळला आणलेले असल्याने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.