स्थैर्य, सातारा, दि.२५: पद्मश्री बाबासाहेब कल्याणी यांनी सातारा पालिकेच्या नावे नाममात्र 1 रुपयांच्या मोबदल्यात प्रदान केलेल्या जागेवर, नगरपरिषदेची भव्य प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाने विशेष बाब प्रशासकीय इमारतीकरीता भरीव निधी मंजूर करावा. नगरपरिषदेच्या झालेल्या हद्यवाढीच्या चौफेर विकासाकरीता, अतिरिक्त निधी मिळावा अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडे केली.
सह्याद्री अतिथीगृह येथे ना. एकनाथ शिंदे, यांचेसमवेत विविध विषयावर सुमारे 2 तास झालेल्या सदिच्छा भेटीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या दोन प्रमुख बाबींसंदर्भात साधार स्पष्ट करताना सांगीतले की, सातारा नगरपरिषदेला पद्मश्री बाबासाहेब कल्याणी यांनी अत्यंत उदार अंतःकरणाने एक रुपया नाममात्र किंमतीमध्ये सुमारे 40 गुंठे जागा नगरपरिषदेच्या नावावर करुन दिली आहे. आजच्या युगात देखील मातृसंस्थेकरीता असे दानशुर कोट्यवधी रुपयांची जागा देतात हे समस्त सातारकरांचे भाग्य आहे. ही जागा आत्ताच्या हद्वाढ झालेल्या भागासह सातारा शहराच्या मध्यवर्ती आहे. या जागेत नगरपरिषदेची सुसज्य अशी मुख्य प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पुण्याचे आर्किटेक्ट श्री.भंडारी, यांनी तयार केलेले आराखडे याकरीता नेमलेल्या ज्युरी पॅनेलव्दारे निवडण्यात आलेले आहेत.
सुसज्य विविध पदाधिकारी दालने, कॉन्फरन्स हॉल, व्हि. सी. हॉल, नगरपरिषदेचे अद्यावत सभागृह, विश्रांतीगृह, कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी उपहारगृह, अभ्यागतांसाठी अभ्यागत कक्ष, यासह विविध सुविधा सह बहुमजली इमारत उभी करण्यात येणार आहेत. त्याकरीता 60 कोटींपेक्षा जास्त रक्कम अंदाजित करण्यात आलेली आहे.
तसेच सातारा नगरपरिषदेची नुकतीच हद्दवाढ झालेली असलेने, हद्दवाढीत समाविष्ठ झालेल्या भागामध्ये विकास कामे करणे करीता अधिकचा/अतिरीक्त निधी सातारा नगरपरिषदेला उपलब्ध करुन द्यावा जेणेकरुन नव्याने समाविष्ठ झालेल्या भागाचा चौफेर विकास करता येईल असे खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.
हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाकरीता सुमारे 17 कोटींचा निधी लवकरच प्रदान करण्यात येईल तसेच प्रशासकीय इमारत होण्याची गरज विचारात घेवून नगरविकास विभागाकडून, प्रथम रुपये 10 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी ना.एकनाथ शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले.
दरम्यान, लवकरच प्रशासकीय इमारतीची पायाभरणी आणि हद्यवाढ भागातील अत्यावश्यक व गरजेच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल, असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे. या सदिच्छा भेटीच्या वेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक अॅड.डि. जी. बनकर, काका धुमाळ, अॅड. विनीत पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.