
स्थैर्य, फलटण, दि. 11 ऑक्टोबर : लायन्स क्लब संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने आयोजित ‘किल्ला महोत्सवा’ला येथील माळजाई मंदिर परिसरात उत्साहात प्रारंभ झाला आहे. स्पर्धकांना किल्ले बनविण्यासाठी जागांचे वाटप करण्यात आले असून, काही मंडळांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली आहे.
या महोत्सवाची माहिती देताना समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर म्हणाले की, “ही स्पर्धा ६ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत चालणार आहे. स्पर्धकांसाठी १२x८ फुटांचे मर्यादित प्लॉट्स उपलब्ध असून, नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.” बारव बाग येथील एकता गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या किल्ल्याच्या कामाला सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.
किल्ले बनवण्यासाठी लागणारे पाणी, माती, दगड यांसारखे साहित्य समितीमार्फत पुरवले जाणार आहे. स्पर्धकांनी केवळ आपली कल्पकता वापरून समाजाला प्रेरणादायी संदेश देणारा किल्ला बनवावा, असे आवाहन निंबाळकर यांनी केले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जाणार असून, सहभागी प्रत्येकाला प्रशस्तीपत्रक दिले जाईल. तयार झालेले किल्ले दिवाळीच्या चार दिवसांत नागरिकांसाठी प्रदर्शनासाठी खुले ठेवले जाणार आहेत आणि दिवाळी पाडव्याला बक्षीस समारंभ आयोजित केला जाईल.