युनायटेड वेस्टर्न बॅकेचे माजी अध्यक्ष पी एन जोशी यांचे साताऱ्यात निधन; अर्थ विश्वावर शोककळा – मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । सातारा । येथील युनायटेड वेस्टर्न बॅंकेचे (United Western Bank) माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर नारायण उर्फ पी. एन. जोशी (P. N. Joshi) यांचं आज त्यांच्या कांगा कॉलनीतील घरी अल्पशा आजारानं निधन झालं. संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमीत जोशींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नामवंत अर्थ तज्ञ म्हणून देशभर ओळख असलेल्या जोशी यांचा जन्म चिक्कोडी (कर्नाटक) येथे झाला. त्यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिक्कोडी व बेळगाव या ठिकाणी झालं. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र व इतिहास या विषयांतून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या अर्थशास्त्र विभागात सुमारे १५ वर्ष काम केलं. त्यानंतर ते त्याच ठिकाणी वरिष्ठ अधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी बॅंक ऑफ इंडियात महाव्यवस्थापक म्हणून काम केलं. तेथील त्यांच्या कामाची दखल घेत रिझर्व्ह बॅंकेनं त्यांची युनायटेड वेस्टर्न बॅंकचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली.१९९० ते २००० या दहा वर्षाच्या काळात त्यांनी बॅंकेच्या प्रगतीत योगदान दिलं. या काळात त्यांनी बॅंकेच्या कामकाजात अमुलाग्र बदल केले. संगणकीकरण, एटीएम केंद्र, फॉरेन एक्सजेंज, पब्लिक इश्यू राईटस् या राबविलेल्या अभिनव उपक्रमांची चांगली चर्चा झाली. त्यानंतर ते सारस्वत सहकारी बॅंकचे बॅंकिग डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. त्याबरोबरच सध्या ते येथील शास्त्र महाविद्यालयचे सदस्य, तसेच धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या एमबीए कॉलेजचे गव्हर्निंग बॉडी सदस्य होते. त्याचबरोबर अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त व पी. एन. जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष होते.

बॅंकिंग व आर्थिक क्षेत्रातील जाणकार म्हणून त्यांची देशभर ओळख होती. या संदर्भातील सरकारच्या धोरणांवर त्यांनी वेळोवेळी विविध माध्यमातून लिखाण केलं. त्यांची माय मेमरीज-गिलीम्सेस ऑफ चेंजिंग बॅंकिंग सिनॅरिओ, बॅंकिंग आणि वित्त धोरण – एक परामर्श, बदलत्या बॅंकिंगच्या छटा – माझ्या आठवणी (मराठी) व नॅशनल बॅकिंग पॉलिसी फॉर इनक्लूसिव्ह डेव्हलपमेंट ही पुस्तकं चांगली गाजली. खासगी बॅंक संघटनेचे ते पहिले अध्यक्ष होते. निवृत्तीनंतर ते साताऱ्यात स्थायिक झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज सताऱ्यातील कांगा कॉलनीतील घरात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच युनायटेड वेस्टर्न बॅंक तसेच आयडीबीआय परिवाराला धक्का बसला.

युनायटेडचे माजी जनरल मॅनेजर रत्नाकर तांडेल, सदाशिव क्षिरसागर, माजी व्यवस्थापक अनंत जोशी, बॅंकेच्या अधिकारी संघटनेचे माजी अध्यक्ष डी. आर. देशपांडे, जनरल सेक्रेटरी दत्तात्रय भिडे, आयडीबीआय बॅंक अधिकारी संघटनेचे माजी अध्यक्ष दिलीप वेलणकर, अध्यक्ष गोपाल जरे, सचिव भालचंद्र दामले, बॅंकचे माजी अध्यक्ष व जोशी यांचे पी. ए. विनायक कुलकर्णी चंद्रशेखर नावलीकर यांनी श्रद्धांजली वाहिली. साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, त्यांचे सहकारी अरूण गोडबोले, विश्वास दांडेकर, नगरसेविका स्नेहलता नलावडे, पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. चंद्रकांत नलावडे, मराठा सेवा संघाचे युवराज पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अत्यंदर्शन घेतले.


Back to top button
Don`t copy text!