दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२४ | कोळकी | फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील म्हणजेच तुमच्या सर्वांचे लाडके माजी खासदार रणजितसिंह हेच उमेदवार आहेत असे स्पष्ट मत माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांनी व्यक्त केले.
कोळकी येथील आयोजित कोपरा सभेमध्ये माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते धनंजय साळुंखे – पाटील, भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा, प्रदीप झणझणे, लतीफ तांबोळी, बाळासाहेब काशीद, ॲड. संदीप कांबळे, संदीप नेवसे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री खुबा म्हणाले की; माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरासह विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामे त्यांच्या काळामध्ये मार्गी लावलेली आहेत. काही कारणास्तव त्यांचा पराभव झाला असला तरी केंद्रीय नेतृत्वामध्ये माजी खासदार रणजितसिंह यांचे वजन अतिशय चांगली आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेले सचिन सुधाकर पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे.
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह म्हणाले की; फक्त पाच वर्षाच्या खासदारकीच्या कालावधीमध्ये फलटण शहरासह तालुक्याचा गत पंचवीस वर्षांच्या राहिलेल्या विकासाचा बॅकलॉग आपण भरून काढलेला आहे. काही कारणास्तव आपला पराभव झाला असला तरी राज्याचे व केंद्राच्या नेतृत्वामध्ये आपले संबंध अतिशय चांगले राहणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये फलटण विधानसभेमधून सचिन सुधाकर पाटील यांना घड्याळ या चिन्हावर मतदान करून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून निवडून पाठवावे; फलटण मतदारसंघांमध्ये राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध असून आगामी काळामध्ये विकास कामांच्या बाबतीत कमी पडणार नाही असा शब्द यावेळी त्यांनी दिला.
यावेळी मध्य रेल्वे समितीचे सदस्य रियाज इनामदार यांनी प्रास्ताविक व आभार मानले.