
स्थैर्य, फलटण, दि. 12 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या राजकारणात एक मोठा बदल झाला आहे. फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सोमशेठ जाधव आणि माजी नगरसेवक विक्रम जाधव यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (अजित पवार गट) जाहीर प्रवेश केला.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
प्रभाग क्रमांक १ मधील सोमवार पेठेत सोमशेठ जाधव यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोमशेठ जाधव आणि विक्रम जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन कामकाज करणार आहोत. विधानसभा निवडणुकीपासूनच “बदला घ्यायचा नाही, तर बदल करायचा आहे” हे आमचे धोरण आहे. त्याच धोरणानुसार शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर यांनीही या प्रवेशाचे स्वागत केले. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माजी नगराध्यक्ष सोमशेठ जाधव यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व सोबत आल्याने आगामी काळामध्ये पक्षाची ताकद नक्कीच वाढेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे दैनिक ‘स्थैर्य’ने यापूर्वी दिलेले वृत्त पुन्हा एकदा तंतोतंत खरे ठरले आहे. ‘स्थैर्य’ने दिग्गज नेते आणि माजी नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त दिले होते, त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे.

सोमशेठ जाधव आणि विक्रम जाधव यांच्या प्रवेशामुळे फलटण शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षणीय वाढली आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक १ आणि आसपासच्या परिसरातील राजकीय समीकरणे आता वेगाने बदलण्याची शक्यता आहे.
या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जाधव यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
