
स्थैर्य, फलटण, दि. २२ सप्टेंबर : पुणे महानगरपालिकेत नुकत्याच झालेल्या प्रशासकीय फेरबदलात फलटण नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची पुणे मनपा आयुक्तांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे उपायुक्तपदाचा कार्यभारही कायम ठेवण्यात आला आहे. याच फेरबदलात फलटणचे दुसरे माजी मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्याकडेही महत्त्वाचा विभाग देण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेत नव्याने नियुक्त झालेल्या दोन उपायुक्तांसह इतर अधिकाऱ्यांच्या कामाचे वाटप सोमवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रसाद काटकर यांना परिमंडळ क्र. ३ आणि निवडणूक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच ते पालिका आयुक्तांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही कामकाज पाहणार आहेत. काटकर यांनी यापूर्वी फलटण नगरपरिषदेत आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.
याचबरोबर, फलटणमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलेले निखिल मोरे यांच्याकडे पुणे महानगरपालिकेच्या भूसंपादन व व्यवस्थापन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फलटणमधील आपल्या कार्यकाळात परिचित असलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांना पुणे महानगरपालिकेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्याने त्यांच्यावर प्रशासकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.