दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२२ । सातारा । मायणी (ता. खटाव) पडळ (ता. खटाव) येथील साखर कारखान्यावर सुमारे वर्षभरापूर्वी (११ मार्च) झालेल्या मारहाणीत एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. प्रभाकर घार्गे यांना अखेर न्यायालयाचा जामीन मिळाला आहे. त्यांनी न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातून सातारा जिल्हा बँकेची निवडणूक लढून ती जिंकली होती.
माण-खटाव ॲग्रो प्रोसेसिंग या साखर कारखान्याचे केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात (रा. गोवारे ता. कऱ्हाड) यांच्या मृत्यूप्रकरणी वडूज पोलिसांत एकूण वीस जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी सात ते आठ आरोपींना वडूज पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादीचे खटावचे नेते व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याही नावाचा समावेश होता. घार्गे यांनी उच्च न्यायालयात प्रकृतीचे कारण देत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी झाली होती.
या प्रकरणात जामिनासाठी सत्र, जिल्हा, उच्च न्यायालयाची दारे आ. घार्गे यांनी ठोठावली होती. मात्र, जामीन नाकारण्यात आला. त्यांनी सातारा जिल्हा बँकेची निवडणूक ही न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातूनच लढली होती. त्यामध्ये ते सोसायटी मतदारसंघातून विजयी झाले होते. अखेर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाकडून घार्गे यांना जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, जामीन मिळाल्याचे वृत्त संपूर्ण जिल्हाभर वाऱ्यांसारखे पसरले आणि खटाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील श्री. घार्गे यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.