स्थैर्य, फलटण, दि.२५: येथील फलटण एज्युकेशन सोसायटी संंचलित मुधोजी हायस्कूलमधील माजी संगीत शिक्षक व फलटण म्युझिक सर्कलचे संस्थापक पं.यशवंतबुवा क्षीरसागर (वय 88) यांचे औरंगाबाद येथे नुकतेच (दि.22 मे) वार्धक्याने निधन झाले.
यशवंतबुवा क्षीरसागर उत्कृष्ट संगीत शिक्षक होते. मुधोजी हायस्कूलमध्ये 1958 पासून त्यांनी विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण देत असताना अनेक विद्यार्थी गायक घडविले. फलटण संस्थानचे अधिपती कै.श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर व राणीसाहेब कै.लक्ष्मीदेवी आणि फलटण एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन सचिव कै.श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांचे ते आवडते संगीत शिक्षक होते. कै.श्रीमंत मालोजीराजे यांनी अनेक संगीत कलाकारांना फलटणच्या दरबारात बोलावून त्यांच्या गायनाचा लाभ फलटणकरांना दिला होता. हे ओळखून क्षीरसागर यांनी रसिक संगीतप्रेमींसाठी महाराजांच्या सहकार्याने 1970 साली फलटण म्युझिक सर्कल स्थापन केले व त्या माध्यमातून उत्तमोत्तम गायकांच्या गायनाचा लाभ त्यांनी फलटणकरांना दिला.
आकाशवाणी, पुणे केंद्राने त्यांच्या संगीत क्षेत्रातील उत्तम कामगिरीमुळे त्यांना स्टाफ आर्टिस्ट म्हणून बोलावले. त्यावेळी शिक्षकाची नोकरी सोडून धाडसाने ते ‘आकाशवाणी’ मध्ये दाखल झाले. कार्यक्रम संचालकापासून ते केंद्रसंचालक पर्यंत ते पोचले. पुणे, सांगली, औरंगाबाद, रत्नागिरी आकाशवाणीवर त्यांनी काम केले. सेवानिवृत्तीनंतर ते औरंगाबाद येथे स्थायिक झाले. तिथेही नवोदित गायकांना उत्तेजन देण्यासाठी त्यांनी मराठवाडा संगीत कला केंद्र सुरु करुन मराठवाड्याच्या संगीत क्षेत्रात फार मोठे योगदान दिले होते.
त्यांची ‘भारतीय संगीतके पुरोधा पं.बी.एन.क्षीरसागर’ (चरित्र), ‘स्वरसंदेश’ व ‘स्वरमौलिक’ (काव्यसंग्रह), ‘महान कलाकारांच्या स्वरस्मृती’, ‘संगीतातील भारतरत्न’ अशी ग्रंथसंपदा आहे.
‘बुवा’ या नावाने फलटणमध्ये परिचित असणारे पं.यशवंतबुवा हे त्यांचे थोरले बंधू, प्रसिद्ध संगीतकार पं.बाळकृष्णबुवा यांचे शिष्य होते. येथील ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे ते भाचे जावई होत. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती सुधा (निवृत्त शिक्षीका, फलटण नगरपरिषद), सुपुत्र इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक नामदेव (नामा) (औरंगाबाद), पियाजो (बारामती) कंपनीतील वरिष्ठ कार्यशाळा प्रमुख प्रद्युम्न (शाम), कन्या फर्ग्युसन महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापिका सौ.कल्याणी (बेबी) कुलकर्णी यांच्यासह सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.