“रणजितदादा राजे गटाचा करेक्ट कार्यक्रम करणार; नगरपरिषदेत ‘२७-०’ विजय मिळवणार” – अनुप शहा

"मनोमिलनाची चर्चा हा उरलेल्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न"; राजे गटावर निशाणा


स्थैर्य, फलटण, दि. ३० सप्टेंबर : “माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे राजे गटातील कोणत्याही नेत्याशी मनोमिलन करणार नाहीत, उलट ते आगामी नगरपरिषद निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ‘२७-०’ असा विजय मिळवतील,” असा ठाम विश्वास फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा यांनी व्यक्त केला आहे.

तालुक्यातील राजकीय मनोमिलनाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना अनुप शहा म्हणाले, “राजे गटातील उरले-सुरलेले कार्यकर्तेही माजी खासदार रणजितसिंह यांच्या संपर्कात असून, ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार गटात प्रवेश करणार आहेत. हे माहित असल्याने घाबरलेला राजे गट आपल्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी मनोमिलनाच्या अफवा पसरवून केविलवाणा प्रयत्न करत आहे.”

शहा यांनी खासदार गटातील कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना सांगितले की, “माजी खासदार रणजितसिंह हे त्यांच्यावर विश्वास ठेवून आलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याचा विश्वासघात करणार नाहीत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यामध्ये कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीत ते आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी सर्व ताकदीने ठामपणे उभे राहतील. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.”

“राजे गटातील काही जण खासदार गटातील जुन्या निष्ठावंत व नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये अफवा पसरवून ‘मन’भेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, माजी खासदार रणजितसिंह यांनी सर्वांना योग्य तो मान-सन्मान दिला असून, कधीही भेदभाव केलेला नाही. येणाऱ्या निवडणुकीत फलटण नगरपरिषदेचा नगराध्यक्षसह पंचायत समिती सभापती सुद्धा महायुतीचाच असेल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे,” असे आवाहनही अनुप शहा यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!