स्थैर्य, फलटण, दि. १०: माजी खासदार, जनता दलाचे नेते संभाजीराव साहेबराव काकडे यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने पुणे येथील निवासस्थानी निधन झाले. फलटण येथील माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचे व्याही आणि सह्याद्रीभैय्या चिमणराव कदम यांचे ते आजोबा होत.
निंबूत, ता. बारामती येथील सधन काकडे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व होते. सन १९७१ मध्ये विधान परिषद सदस्य, सन १९७८ मध्ये पुलोदच्या काळात बारामती लोकसभा मतदार संघातून आणि सन १९८२ मध्ये खेड लोकसभा मतदार संघातून जनता पक्षाचे उमेदवार म्हणून ते लोकसभेत निवडून गेले.
विश्वनाथ प्रतापसिंग, चंद्रशेखर, देवीलाल, मोरारजीभाई देसाई या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. घोडगंगा व सोमेश्वर सहकारी साखर कारखाने, मु. सा. काकडे महाविद्यालय व शिक्षण संस्था, लाला अर्बन को-ऑप. बँक मंचर आदी संस्थांच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना करुन त्यामाध्यमातून आदिवासींना दिलासा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
माजी मंत्री बबनराव पाचपुते, बबनराव ढाकणे, माजी खासदार कै. किसनराव बानखेले, संभाजीराव पवार आदींसह अनेक नेते कार्यकर्त्यांना राजकीय ताकद देवून उभे करण्यात किंबहुना त्यांना राजकीय दृष्ट्या घडविण्यात स्व. संभाजीराव काकडे यांचे मोठे योगदान होते.
जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष, सहकार तज्ञ संभाजीराव काकडे सामान्यांमध्ये लाला या नावाने परिचित होते. स्व. संभाजीराव काकडे गेली काही वर्षे राजकीय घडामोडींपासून अलिप्त होते, मात्र त्यांचे राजकीय घटना घडामोडीवर बारकाईने लक्ष असायचे, सल्ला मसलतीसाठी आणि त्यांचे अनुभवाचे बोल ऐकण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या टिळक रोडवरील निवासस्थानी आजही आवर्जून येत असत त्यावेळी त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करण्यात ते समाधानाने सहभागी होत असत.