फलटणमध्ये ‘विकासाचा चढता आलेख’! “शब्द दिलाय, तो पूर्ण करणारच!” – रणजितदादांचा ‘ॲक्शन प्लॅन’ सज्ज!”


स्थैर्य, फलटण, दि. ६ मार्च : नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आणि लोकनियुक्त नगराध्यक्षपदी समशेरसिंह नाईक निंबाळकर विराजमान झाल्यानंतर फलटण शहरातील विकासकामांचा आलेख वेगाने उंचावत आहे. सत्तेचे पारडे फिरताच शहराला कशाप्रकारे ‘व्हिजनरी’ नेतृत्व मिळते, याची प्रचिती नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या आढावा बैठकीत आली.

माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या अनेक ऐतिहासिक निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या बैठकीला ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले आणि मुख्याधिकारी निखील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

“शब्द दिलाय, तो पूर्ण करणारच!” – रणजितदादांचा ‘ॲक्शन प्लॅन’

मुख्याधिकारी निखील जाधव यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनंतर, माजी खासदार रणजितसिंहांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, “फलटणकरांना दिलेला प्रत्येक शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे.” मार्च अखेरपर्यंत केंद्र, राज्य आणि नगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या ‘वर्क ऑर्डर’ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या बैठकीत रणजितदादांच्या दूरदृष्टीतून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले:

  • करवाढीला ‘ब्रेक’, नागरिकांना दिलासा: सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, आगामी ५ वर्षांत शहरातील संकलित कर (Property Tax) अजिबात वाढवला जाणार नाही; उलट तो कमी कसा करता येईल, यावर नगरपालिका काम करणार आहे.

  • ‘झिरो’ वीजबिल: नगरपालिकेचा वीजखर्च शून्यावर आणण्यासाठी सौरऊर्जा (Solar) प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.

  • पायाभूत सुविधांचा महापूर: शहरात नवीन उद्याने, अद्ययावत रस्ते, नाट्यगृह, तारांगण आणि हॉस्पिटलला मंजुरी मिळाली आहे. आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून ६ कोटी व राज्य नियोजन मंडळातून १० कोटी असे १६ कोटी रुपये फक्त रस्त्यांसाठी आणले आहेत.

  • ‘अ’ वर्ग नगरपालिकेची वाटचाल: फरांदवाडी, ठाकूरकी, जाधववाडी आणि चौधरवाडी या गावांचा समावेश करून हद्दवाढ केली जाणार असून, फलटण नगरपालिकेला ‘अ’ वर्ग दर्जा मिळवून देणार आहे.

  • १७ एकरात भव्य स्टेडियम आणि विमानतळाचे सुशोभीकरण: फरांदवाडी हद्दीत तब्बल १७ एकरांवर भव्य स्टेडियम उभारले जाणार आहे. तसेच विमानतळ परिसरात हेलिपॅड, हँगिंग गार्डन आणि ॲमिनिटी पार्कची निर्मिती होणार आहे.

  • महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे: शहरातील प्रमुख चौकांमध्ये स्वच्छतागृहे उभारली जातील, ज्यापैकी ३-४ खास महिलांसाठी असतील.

  • पालखी महामार्ग आणि पाणीपुरवठा: अंतर्गत पालखी मार्गावरील चौकांचे सुशोभीकरण आणि दर्जेदार रस्ते करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिण्याच्या पाईपलाईनसाठी अतिरिक्त ८ कोटी मंजूर केले आहेत. तसेच दलित वस्तीसाठी ८ ते ९ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

कामचुकार ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा!

विकासात अडथळा आणणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. जुन्या भुयारी गटार योजनेचे ऑडिट करून नक्की त्यामध्ये काय करता येईल ? याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्धवट कामे करणाऱ्या ठेकेदारांचे डिपॉझिट जप्त करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आणि गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश रणजितसिंहांनी दिले आहेत. तसेच सुपर मार्केटची जुनी इमारत पाडून तिथे भव्य पार्किंग आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे राहील.

हायटेक सुरक्षा आणि प्रशासकीय बळकटी

अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयामुळे फलटणमध्ये ६ नवीन तहसीलदार आणि महसूल प्रांताधिकारी येत आहेत. शहराच्या सुरक्षेसाठी लोकसहभाग आणि राज्य शासनाच्या निधीतून ‘हाय क्वालिटी नाईट व्हिजन’ आणि ‘नंबरप्लेट डिटेक्शन’ कॅमेरे लावून नगरपालिकेत स्वतंत्र ‘कंट्रोल रूम’ उभारली जाणार आहे.

मुख्यमंत्री महोदयांसोबत विशेष बैठक

हद्दवाढ, प्रलंबित रिंगरोड आणि २४x७ पिण्याचे पाणी या विषयांवर आगामी २८-२९ तारखेला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित केल्याची माहिती रणजितसिंहांनी दिली.

‘फलटण जिल्हा’ होणारच!

बैठकीच्या शेवटी रणजितसिंहांनी आपला मास्टरप्लॅन स्पष्ट करताना सांगितले की, “फलटण जिल्हा होण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू आहे. उद्याचा जिल्हा आणि त्याचे मुख्यालय ज्या दिमाखात असायला हवे, त्याच धर्तीवर फलटण शहराचा कायापालट केला जाईल.”

या आढावा बैठकीला नगरसेवक सोमाशेठ जाधव, सुदाम (अप्पा) मांढरे, अशोकराव जाधव, राहुल निंबाळकर, अमित भोईटे, संदिप चोरमले, रोहित नागटिळे, सचिन अहिवळे, किरण जाधव यांच्यासह नगरसेविका सौ. मंगलादेवी नाईक निंबाळकर, सौ. सुपर्णा अहिवळे, सौ. रूपाली सस्ते, सौ. मिना काकडे, सौ. मोहिनी हेंद्रे, कुमारी सिद्धाली शहा उपस्थित होत्या.

तसेच अमरसिंह नाईक निंबाळकर, रणजितसिंह भोसले, अनुप शहा, अमोल सस्ते, सनी मांढरे आणि श्रीवल्लभ हेंद्रे या दिग्गजांचीही प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!