दैनिक स्थैर्य । 28 नोव्हेंबर 2024 । फलटण । विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम संपताच माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला दिल्ली दौरा केला असून या दौर्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध दिग्गज नेत्यांनी फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या यशाबद्दल रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन केले आहे.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघात गत 30 वर्षांपासूनच्या प्रस्थापित सत्तेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांचा विजयश्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खेचून आणला आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर व फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या अनुषंगाने झालेल्या दिल्ली दौर्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाल्याचे पहायला मिळाले.
सदर दौर्यादरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली असता शहा यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर व नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच राज्याच्या राजकारणाच्या सक्रीय राहण्याबाबत संकेत देवून पक्षाकडून व वैयक्तीक पातळीवर सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन शहा यांनी दिले.
या दौर्यात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री ना. चंद्रकांत आर. पाटील यांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट घेवून फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघात सध्या सुरु असलेल्या नीरा देवघर सिंचन प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत माजी केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखवत यांनी केला असल्याचे सांगून सदर प्रकल्पाच्या कामांना गती मिळण्यासाठी केंद्र शासनाकडून लवकरात लवकर निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली. या मागणीवर सकारात्मक उत्तर देवून फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील यशाबद्दल रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ना. चंद्रकांत आर. पाटील यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री ना.गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ, बिहारचे माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा संसद भवनमधील अंदाज समितीचे अध्यक्ष खा. डॉ. संजय जयस्वाल, खा.देवुसिंग चौहान आदींनीही फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील अभूतपूर्व यशाबद्दल रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.