
स्थैर्य, फलटण, दि. १७ मार्च : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे आक्रमक नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष भेट घेतली. राजकारणात पद असो वा नसो, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी दिल्लीच्या दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्याची रणजितदादांची तळमळ या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बुलेट ट्रेन आणि हायवेला ‘ग्रीन सिग्नल’चे संकेत
या भेटीदरम्यान ‘मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन’ प्रकल्पावर विशेष चर्चा झाली. विशेष म्हणजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार असतानाच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तांत्रिक (टेक्निकल) मंजुरी मिळाली होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित विभागास आदेश दिले आहेत. तसेच, लवकरच कॅबिनेट मीटिंगमध्ये याला मंजुरी घेऊन पुढील कारवाई करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचनाही पंतप्रधानांनी दिल्या आहेत. यासोबतच ‘मुंबई-बेंगलोर कॉरिडॉर हायवे’ बाबतही सविस्तर चर्चा झाली असून, या प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी संबंधित सचिवांना दिल्या आहेत.
रेल्वे प्रकल्पांचा पंतप्रधानांकडून आढावा
फलटण आणि माढा मतदारसंघाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ‘बारामती-फलटण’ आणि ‘फलटण-पंढरपूर’ रेल्वेमार्गाच्या कामाची संपूर्ण आणि अद्ययावत माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणजितसिंह यांच्याकडून जाणून घेतली. रणजितसिंहांचे पंतप्रधानांसोबतचे हे थेट संबंध फलटण व माढा लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत.
प्रलंबित प्रश्नांसाठी लवकरच केंद्र-राज्य संयुक्त बैठक
माढा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. संसदेचे सध्याचे अधिवेशन संपताच, माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसाठी लवकरच केंद्र शासन आणि राज्य शासन यांची संयुक्त बैठक लावण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.
पंतप्रधानांसोबतच्या या अत्यंत फलदायी भेटीमुळे, मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न या निमित्ताने मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे, असा सार्थ विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

