
स्थैर्य, फलटण, दि. २६ सप्टेंबर : महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियाना’अंतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून फलटण येथील सजाई मंगल कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या शिबिराला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी विविध शासकीय विभागांनी उभारलेल्या सेवा केंद्रांना भेट देऊन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नागरिकांना मिळणाऱ्या सेवा प्रभावी आणि पारदर्शकपणे राबविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शासनाच्या योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने सक्रिय राहावे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार सचिन कांबळे-पाटील, प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, प्रभारी गटविकास अधिकारी सतीश कुंभार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, वनविभागीय अधिकारी सौ. निकिता बोटकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.