फलटणचे हक्काचे पाणी इतरत्र कुठेही जावू देणार नाही : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 17 एप्रिल 2025 | फलटण | फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी इतरत्र देण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे, सदरचे फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी इतर तालुक्याला जावू देणार नाही, त्यासाठी वाटेल ते करावे लागले तरी करू, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण येथील “लक्ष्मी – निवास” पॅलेस या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार दिपक चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे बोलत होते. यावेळी श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील (दत्ता) अनपट, फलटण दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, फलटण तालुक्यामध्ये सिंचनाखाली असलेले क्षेत्र येणाऱ्या काही दिवसात कमी होण्याची दाट शक्यता आहे. फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी दिल्यावर वास्तविक फलटण तालुक्याचे पाणी कमी होणार आहे. फलटण, माळशिरस व खंडाळा या तालुक्यातील नागरिकांनी एकत्रित येत या निर्णयाच्या विरोधात ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. तरच या तालुक्याचे हक्काचे पाणी वाचणार आहे.

फलटण शहराची उपनगरे समजले जाणाऱ्या कोळकी, जाधववाडी व तालुक्यामधील मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरवाडी व विडणी या ठिकाणी नगरपंचायती होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही आमच्या काळामध्ये सदरील प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे दिलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये कोळकी गावातील काही भाग फलटणला जोडण्याचा प्रयत्न केला जात होता; परंतु त्यावेळी आम्ही यास विरोध करून कोळकीचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहण्यासाठी नगरपंचायत करण्यात यावी, असा प्रस्ताव केलेला आहे. त्यामुळे जर नगरपंचायत होत असेल तर जरूर करावी, परंतु तो प्रस्ताव आम्ही दिलेला आहे, अशी आठवण सुद्धा श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी करून दिली.

राज्यामध्ये एकमेव आमदार असे असतील की त्यांनी प्रस्तावित केलेली विकास कामे रद्द करण्याबाबत राज्य शासनाकडे पत्र दिलेले आहे. यामुळे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबणार आहेत, हे आमदारांना कळत नसावे. आम्ही प्रस्तावित केलेल्या कामांचे श्रेय तुम्ही घ्या परंतु फलटण तालुक्यातील विकास कामे पूर्णत्वास न्या, असे मत यावेळी माजी आमदार दिपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे निरा देवधर प्रकल्पाला गती देण्याचे काम करण्यात आलेले होते. सदरील कामकाजामुळेच आता नीरा देवधरचे काम पुढे गेलेले आहे. 2014 सालानंतर निरा देवधरसाठी निधी थांबवण्यात आलेला होता. त्यावेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक रुपयाचा निधी सुद्धा नीरा देवधर साठी आलेला नाही, असे मत सुद्धा माजी आमदार दिपक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.

गत 25 वर्षांमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये केलेल्या विकास कामांचा आढावा यावेळी माजी आमदार दिपक चव्हाण यांनी घेतला.


Back to top button
Don`t copy text!