स्थैर्य, वडूज, दि. १२: पडळ ता. खटाव येथील खटाव – माण ऍग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांना मारहाणीनंतरच्या मृत्यू प्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना वडूज पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार १५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडूज न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जगदीप थोरात (रा. गोवारे ता. कऱ्हाड) यांच्या मृत्यू प्रकरणी वडूज पोलीसात एकूण वीस जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी सात ते आठ आरोपींना वडूज पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी उच्च न्यायालयात प्रकृतीचे कारण देत जामीन अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांच्या विरुध्द अटक वॉरंट न्यायालयाने काढले होते. त्यानंतर सातारा येथे वैद्यकीय उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले होते. त्यांना हॉस्पिटलमधून डीस्चार्ज दिल्यानंतर वडूज पोलीसांनी त्यांना सातारा येथून ताब्यात घेतले.
माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना वडूज येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवार दि. १५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अधिक तपास सपोनि मालोजीराव देशमुख करत आहेत.