राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार युन्नूसभाई शेख यांचे निधन


स्थैर्य, सोलापूर, दि. 14 : सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचा रविवारी सकाळी करोनामुळे मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते निष्ठावंत अनुयायी मानले जात होते. शिवाय ते पन्नास वर्षे राजकारणात सक्रिय होते.

दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे एका खासगी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांची करोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. वृद्धत्व, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळू शकला नाही. अखेर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

१९६९, १९७४ आणि १९९५ अशा तीन वेळा सोलापूर महापालिकेवर ते निवडून गेले होते. १९७४-७५ साली त्यांनी महापौरपदाची जबाबदारी सांभाळली होती. शहरातील शरद पवार यांच्या राजकारणाची सूत्रे एकेकाळी त्यांनीच हाताळली होती. विशेषतः महापालिकेचा कारभार त्यांच्याच हाती एकवटला होता. १९९२ साली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना विधान परिषदेवर बिनविरोध निवडून पाठविण्यात आले होते. मात्र दुसऱ्यांदा १९९७ साली त्यांना पराभव पत्करावा लागला होता. अखेरपर्यंत त्यांची शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम होती. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!