स्थैर्य, सातारा, दि. १३ : राज्यात सुरू झालेली दलितांवरील अत्याचारांची मालिका थांबेनासी झाली आहे. शिवसेनेचे धारावी मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार आणि चर्मकार समाजाचे नेते बाबुराव माने यांना त्यांच्या नेर ता. खटाव गावात जातीवाचक शिवीगाळ करत तीन जणांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे.
या प्रकरणात खटाव तालुक्यातील पुसेगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विविध पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या असून तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली असा इशारा देण्यात आला आहे. काही राजकीय मंडळी हे आरोपींना मदत करीत असून त्यांचा जातीयवादी दृष्टिकोन आता गावगाडा सोबत अनेक वर्षे राहणाऱ्या चर्मकार समाज्याला समजला आहे. याची समाज्यातील वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या लोकांनी नोंद घ्यावी अशी अपेक्षा दलित, बौद्ध, मातंग, ढोर व चर्मकार युवक व्यक्त करीत आहेत.
ही घटना शनिवार दि २७ जून रोजी गावातच घडली असली तरी पुसेगाव पोलीस गुन्हा दाखल करण्यास सोमवार दि ६ जुलैपर्यंत वाट पाहत बसले होते. शिवाय, एक आरोपी आज जामिनावर बाहेर आला असून दोन आरोपी मात्र अजूनही मोकाट आहेत. त्या तिघांवरही अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासाहित आयपीसीच्या कलम ३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना राजकीय व जातीय मानसिकतेतून पुसेगाव पोलीस ठाणे कारवाई करीत नसल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनेने केला आहे.
पुसेगाव पोलिसांनी पीडित फिर्यादी दलित चर्मकार आहे आणि आरोपी हे इतर मागासवर्गीय माळी समाज्यातील आहेत,अशी बोळवण करून कायद्यालाच आव्हान दिले होते. पोलीस ठाण्यात जाऊन एका नामांकित वकिलाने कायद्याबाबत रक्षणकर्त्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कायदा समजून घ्यायला भाग पाडले त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी गुन्हा दाखल केलाआहे. या भागात शिवसेनेचे आमदार महेश शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आ. शशिकांत शिंदे नेतृत्व करीत आहेत. ते दोन्ही सत्ताधारी पक्षात आहेत. हे विशेष आहे.
दरम्यान, बाबुराव माने हे सध्या त्यांच्या नेर- खटाव या गावात असून मारहाणीच्या घटनेने त्यांच्यावर मोठाच मानसिक आघात झाल्याने त्यांनी दूरध्वनीवर बोलणे टाळले आहे.
शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांना करण्यात आलेल्या मारहाणीची ही घटना नेर- खटाव या गावात २७ जून रोजी दिवसाढवळ्या भर चौकात घडली. ‘हा प्रकार घडताना ५०-६० जणांची गर्दी जमली होती. त्यांच्या समक्ष गावातील दत्ता बनकर, हनुमंत दत्ता बनकर, गणेश दत्ता बनकर या तिघांनी जातीवरून शिव्या हासडत आपल्याला मारहाण केली. या प्रकाराने आपली गावात मानहानी आणि नाचक्की झाली,’ असे माने यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.