
दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. भावना माणिकराव सोनवलकर या दुधेबावी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. याबाबत फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेले व त्यानंतर आपल्या पत्नी यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यानंतर सुद्धा आता ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी पुन्हा सौ. भावना माणिकराव सोनवलकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहे. याबाबत फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चांना उधाण आलेले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव झाल्यानंतर काही वर्षांसाठी माणिकराव सोनवलकर यांना मिळाले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या पत्नी सौ. भावना माणिकराव सोनवलकर यांना फलटण तालुक्यातील कोळकी जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत उमेदवारी मिळवत जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवून दिलेली होती. सौ. भावना माणिकराव सोनवलकर यांनी पाच वर्ष जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व केलेले असताना सुद्धा पुन्हा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी उभे राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत.
याबाबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्याशी संवाद साधला असता, दुधेबावी ग्रामस्थांच्या आग्रहामुळे सौ. भावनाताई सोनवलकर यांना लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहे. दुधेबावी गावाचा सर्वांगीण विकासासाठी यापूर्वीही आम्ही कटिबद्ध होतो व आगामी काळामध्ये सुद्धा कटिबद्ध राहणार आहोत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत आहोत.