विद्वान, व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार
स्थैर्य, मुंबई, दि. 29 : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ. बलभिमराव नरसिंगराव तथा बी. एन. देशमुख-काटीकर यांच्या निधनाने विद्वान, व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बी. एन. देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असताना बी. एन. देशमुख यांना राज्य विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. विधान परिषदेत सहा वर्षे त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधित्व केले होते. या काळात राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला होता. सभागृहातील त्यांच्या योगदानाची कायमच नोंद घेतली जाईल.
त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शेतकरी, कष्टकरी, कामगार तसंच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय ‘ऐतिहासिक’ ठरले. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिले. १९९७ मध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरुन ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. त्यांच्या निधनाने अभ्यासू मार्गदर्शक हरपला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.