
दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२२ । मुंबई । महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कटीकल शंकरनारायणन यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
शंकरनारायणन हे प्रामाणिकपणा व सचोटीसाठी परिचित असे आदरणीय व लोकप्रिय नेते होते. केरळ विधानसभेचे दीर्घकाळ सदस्य राहिलेले शंकरनारायणन हे उत्तम प्रशासक होते. केरळचे वित्तमंत्री म्हणूनदेखील त्यांनी काम केले होते. महाराष्ट्रातील राज्यपालपदाच्या आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी उच्च शिक्षण, मागास भागांचा विकास व आदिवासी विकास या विषयांमध्ये विशेषत्वाने लक्ष घातले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण 6 राज्यांच्या राज्यपालपदाचा कार्यभार सांभाळला होता. आपल्या निःपक्ष वर्तनातून त्यांनी राज्यपालपदाची प्रतिष्ठा वाढवली. दिवंगत शंकरनारायणन यांना मी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांची कन्या तसेच इतर आप्तेष्टांना कळवतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
केरळ येथील पालघाट येथे शंकरनारायणन यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.