शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांना पालिकेच्या दालनात ठेकेदाराकडून बेदम मारहाण


स्थैर्य, सातारा, दि. 15 : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांना सोमवारी पालिकेच्या दालनात करंजेतील ठेकेदाराकडून बेदम मारहाण करण्यात आली. जिल्हा रुग्णालय ते पारंगे चौक या दरम्यानच्या कामाच्या ठेक्यावरून करण्यात आलेल्या तक्रारीवरून ठेकेदाराचा संयम सुटल्याने बांधकाम विभागाच्या केबीनमध्ये फ्रीस्टाईल मारामारी झाली. या प्रकाराने पालिकेच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून सातार्‍यातील सामाजिक संघटनांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.

सातारा पालिकेचा कारभार आरोग्य विभागाच्या भ्रष्टाचारामुळे आधीच चर्चेत आहे. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या लाचप्रकरणातील धूळ खाली बसते न बसते तोवरच बांधकाम विभागात सोमवारी मारामारी नाट्य घडले. बांधकाम विभागाकडून सातारा शहरातील रस्ते व गटारी यांचे काही ठेके देण्यात आले आहेत. या ठेक्याची कामे ठेकेदारांकडून 15 मे पूर्वी करणे गरजेचे होते. मात्र, काही ठेकेदारांकडून ही कामे पावसाळ्यात सुरू राहिल्याने ही प्रकरणे पालिकेच्या बांधकाम विभागाच्या रडारवर आली. शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी अशा जिल्हा रुग्णालय ते पारंगे चौक या दरम्यानच्या रस्त्याचे व गटाराचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे केली. त्यामुळे ठेकेदार गणेश पवार व नरेंद्र पाटील यांच्यामध्ये वारंवार खटके उडत होते. पावसामुळे सदर बझार परिसरातील लाईट वारंवार जात असून या परिसरातील काही वृक्षही धोकादायक बनले होते. या वृक्षांची छाटणी करण्यासंदर्भात अर्ज देण्यासाठी नरेंद्र पाटील सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता नगरपालिकेच्या बांधकाम विभागात आले. दरम्यान, अचानक तेथे मुळ ठेकेदार आणि त्यांचे सब ठेकेदार गणेश पवार आले. ठेकेदार व नरेंद्र पाटील यांची चर्चा सुरू असतानाच तु स्वतःला फार शहाणा समजतो का असे म्हणत संयम सुटलेल्या गणेश पवार याने नरेंद्र पाटलांना बेदम मारहाण सुरू केली. अचानक झालेल्या या प्रकाराने सारेच अवाक झाले. यावेळी दालनामध्ये अभियंता सुधीर चव्हाण, अभियंता साबळे व मोहन प्रभुणे यांनी या भांडणामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला व नरेंद्र पाटील यांना बांधकाम विभागाच्या बाहेर नेले. या प्रकारामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून पालिकेतील अनियमित कारभार, भ्रष्टाचार, विकासकामातील टक्केवारी व निकृष्ट कामे यावरून प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. नरेंद्र पाटील यांना झालेल्या मारहाण झालेल्या प्रकरणाचा म्युन्सिपल कामगार संघटनेने निषेध केला. या प्रकरणानंतर पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे नरेंद्र पाटील यांनी तक्रार केली. वारंवार तक्रार करूनही सदर बझारमधील कामांमध्ये आपण कारवाई करत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला.

दरम्यान, हे वृत्त समजताच अनेक संघटनांनी पालिकेत धाव घेवून माहिती घेण्यचा प्रयत्न केला. सातारा पालिकेतील निकृष्ट कामांची माहिती देेवूनही मुख्याधिकारी प्रशासनाला पाठीशी घालतात. त्यामुळे वेळप्रसंगी कायदा हातात घेण्याची नागरिकांवर येणार आहे.  या प्रकरणाचा निकाल लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!