स्थैर्य, पटना, दि. ९: बिहारमध्ये नोकरी सोडून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत राजकारणाचा नवा डाव खेळत असलेले माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडेय यांना तिकिटाच्या स्पर्धेत सेवानिवृत्त शिपायाकडून पराभूत व्हावे लागले. १६ दिवसांपूर्वी म्हणजे २२ सप्टेंबरला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेऊन जदयूत प्रवेश केला होता. पक्ष त्यांना बक्सरमधून तिकीट देईल, असे मानले जात होते. पण निश्चित समजला जाणारा बक्सर मतदारसंघ रालोआअंतर्गत भाजपच्या खात्यात गेला. भाजपनेही विलंब न करता सेवानिवृत्त पोलिस शिपाई परशुराम चतुर्वेदींना तिकीट दिले. तिकीट न मिळाल्याने माजी डीजीपी निराश झाले नाहीत, पण अत्यंत भावुक होऊन ते म्हणाले – राजकारणात काही मजबुरी असते. नितीश कोणाला फसवत नाहीत…’
सरकारने गुप्तेश्वर पांडेय यांच्या व्हीआरएसला मंजुरी दिली, त्यानंतर काही वेळातच ते कुर्ता-पायजमा आणि बंडीत सोशल मीडियावर नव्या अवतारात दिसू लागले. त्यांनी जदयूत प्रवेश केला तेव्हा निवडणूक लढवण्यासाठीच त्यांनी व्हीआरएस घेतली होती या शक्यतेला बळ मिळाले. पण बक्सरचे तिकीट परशुराम चतुर्वेदींना देण्यात आले. परशुराम १९९१ मध्ये शिपाईपदी नियुक्त झाले होते आणि १९९४ मध्ये नोकरी सोडून भाजपचे दिग्गज नेते लालमुनी चौबे यांच्यासोबत राहिले. नंतर ते राजकारणातच रमले. ते वाल्मीकीनगर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढू शकतात, अशीही चर्चा होती. पण जदयूने तेथून खासदार राहिलेले स्व. वैद्यनाथ प्रसाद महतोंचा मुलगा सुनीलकुमार यांना उमेदवारी दिली. दोन्ही जागांवर उमेदवार घोषित झाल्यावर अखेर आपण निवडणूक लढणार नाही, असे गुप्तेश्वर पांडेय यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. राजकीयदृष्ट्या फसवणूक झाल्याचे दु:ख त्यांच्या वाणीतून व्यक्त झाले. त्यांनी लिहिले- ‘हताश, निराश होण्याची गोष्ट नाही. माझे आयुष्य संघर्षातच गेले आहे. मी आयुष्यभर जनतेची सेवा करत राहीन. यापुढे पक्ष जी जबाबदारी माझ्याकडे देईल ती मी पार पाडेन.’
२००९ मध्येही राजीनामा देत उतरले होते मैदानात, तेव्हाही निराशाच
पांडेय यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही राजीनामा दिला होता. बक्सर मतदारसंघाचे तिकीट मिळेल, अशी आशा त्यांना होती. पण तसे झाले नाही. तेव्हा राजीनामा मंजूर झाला नाही, ते पुन्हा नोकरीत आले. ११ वर्षांनी नोकरी सोडून पुन्हा राजकारणात आले, पण यावेळी बाजी हाती आली नाही.