दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२४ | फलटण | आमच्या नेतृत्त्वाला हिणवण्याआगोदर तुम्ही जाहीर केलेली उमेदवारी आम्ही धुडकावली हे विसरु नका. फलटणच्या श्रीमंतांनी विकासासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहेत. आमचे राजे श्रीमंतच आहेत; जर आमच्या राजघराण्याला, आमच्या अस्मितेला कुणी हिणवायची हिंमत केली तर इथली जनता त्याला कदापी माफ करणार नाही, असा इशारा राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिला आहे.
गत काही दिवसांपूर्वी साखरवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टिका केली होती. त्या टिकेला अनुसरुन प्रितसिंह खानविलकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
नुस्ता नट्टा – पट्टा करणे म्हणजे विकास होत नाही
फलटणच्या श्रीमंतांनी फलटण तालुका 80% बागायत केला आहे. बागायती क्षेत्रात आज फलटण तालुका बारामतीच्या पुढे गेला आहे. श्रीमंतांच्या मुळेच फलटण तालुक्याचा दुष्काळ दूर झाला असून युवकांच्या हाताला रोजगारही मिळाला आहे असे नमूद करुन नुस्ता नट्टा – पट्टा करणे म्हणजे विकास होत नाही; अशी उपरोधिक टिकाही प्रितसिंह खानविलकर यांनी केली आहे.
विरोधकांची डबल ढोलकी तालुक्यातील सर्वसामान्य मतदार ओळखून
काल – परवापर्यंत जे अजित पवारांना पाणी चोर म्हणत होते तेच आज घसा कोरडा पडेपर्यंत त्यांचे कौतुक करत आहेत. ज्या सासूसाठी भांडण केलं तिचं सासू त्यांच्या वाट्याला आली आहे. विरोधकांची डबल ढोलकी तालुक्यातील सर्वसामान्य मतदार ओळखून असून दीपक चव्हाणांसारख्या शांत, संयमी, सुशिक्षीत उमेदवारालाच जनता विजयी करेल आणि दीपक चव्हाण विजयी चौकार मारण्यात यशस्वी होतील, असा विश्वाही प्रितसिंह खानविलकर यांनी व्यक्त केला आहे.