माजी नगरसेवक सनी अहिवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; राजे गटाला मोठा धक्का


स्थैर्य, फलटण, दि. 11 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक २ चे तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सनी (भैय्या) अहिवळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. आमदार सचिन पाटील आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, फलटण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दमदार कामकाज करीत आहे. येणाऱ्या काळामध्ये सनी अहिवळे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २ चे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत.

श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी यावेळी सांगितले की, संपूर्ण फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून आम्ही कामकाज करीत आहोत. फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. सनी (भैय्या) यांच्या रूपाने राष्ट्रवादीला शहरात एक खंबीर युवा नेतृत्व मिळाले आहे. त्यांचा यथोचित सन्मान ठेवण्याचे कामकाज राष्ट्रवादी पार्टी नक्की करणार आहे.

राजे गटाला मोठा धक्का; संभाव्य गळती कोण थांबवणार?

युवा नेते सनी अहिवळे यांच्या या ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या पक्षप्रवेशाने फलटण शहरातील राजे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. या पक्षप्रवेशामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. सनी अहिवळे यांच्यामुळे आगामी काळात राजे गटाची होणारी संभाव्य गळती कोण थांबवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!