
स्थैर्य, मुंबई, दि. ५ : राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या निधनाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणार महत्त्वाचं नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे नेतृत्व हे संघर्षातून निर्माण झालं होतं. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी संघर्ष केला. सामाजिक, वैचारिक बांधिलकी जपणारे निष्ठावान नेतृत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.