स्थैर्य, कराड, दि. 30 : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतीच चीनी अॅपवर बंदी घातली आहे. चीनी अॅप भारतीयांची माहिती परदेशात पाठवतात यामुळे ही बंदी घातली असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर नमो अॅपवरही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. 130 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आली आहे म्हणून सरकारने 59 चिनी मोबाईल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अॅप देखील बंद केले पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. ही मागणी करताना बॅन नमो अॅप हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. त्यामुळे खासगी माहितीच्या निकषावर चिनी अॅप बंद करणारे मोदी सरकार त्याच आधारे नमो अॅपवरही बंदी घालणार का? याकडे सर्वांच लक्षं लागलं आहे. काँग्रेसच्या या आरोपाला भाजप काय उत्तर देणार? याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल 59 चिनी अॅपवर बंदी घातली होती. टिकटॉक, हॅलो अॅप आणि कॅमस्कॅनरसह 59 अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. भारतात युट्यूबहून अधिक युजर्स हे टिकटॉक अॅपचे आहेत. टिकटॉकचे जवळपास 20 कोटी युजर्स असल्याचं सांगण्यात येतंय. तर हेलो अॅपचे भारतात 40 हजार युजर्स आहेत. वुई मेट, शेअर इट, युसी ब्राउजर्स, क्लब फॅट्री, युसी न्यूज, झेंडर, लाइक, सीएम ब्राउजर्स, शीन, न्यूजडॉग, वंडर कॅमेरा, कॅम स्कॅनर, क्लिन मास्टर-चिता मोबाइल, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, स्वीट सेल्फी, हेलो, यू व्हिडिओ, मोबाइल लेजंड्स अशा एकूण 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
भारत सरकारने याधी चिनीमधून होणार्या थेट परकिय गुंतवणुकीवर निर्बंध घातले आहेत. चीनमधून भारतात गुंतवणूक करण्यासाठी सरकारची अधिकृतरित्या परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे चीनला झटका बसला आहे. तर दुसरीकडे भारत सरकार चिनीमधील निकृष्ट दर्जाच्या वस्तुंच्या आयातही बंद करण्याच्या विचारात आहेत. या वस्तुंची यादीही सरकारला देण्यात आली आहे. चीनशी होणारा व्यापारी तोटा खूप मोठा आहे. यामुळे भारत सरकार यापुढे आणखी महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.