
स्थैर्य, दि.१९: भाजपचे लोकप्रिय माजी आमदार सरदार तारासिंह यांचं आज सकाळी लिलावती रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली.
सरदार तारासिंह हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर मुलुंड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्विट करत लिहिले की, ‘माझे वरिष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे आज सकाळी लीलावती रुग्णालयात प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो’ असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.