स्थैर्य, सातारा, दि. 13 : लॉकडाउनच्या सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीतील घरगुती वीज बिले माफ करावीत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे आज एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर संघटनेने वीज बिल फाडो आंदोलन केले.
निवेदनात म्हटले आहे, की कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनच्या काळात घरगुती वीज बिलाच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अव्वाच्या सव्वा दराने वीज आकारणी झाल्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. दुप्पट-तिप्पट वीजबिलांची आकारणी केल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यापासून 5 ते 55 टक्के बिलामध्ये वाढ केल्याचे दिसून येत आहे. लॉक डाउनमुळे सध्या सर्वत्र आर्थिक मंदी असून अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. शेतीक्षेत्राचेही प्रचंड नुकसान झाले आहे. वीज बिलाच्या पाठीमागे मार्गदर्शक तक्त्यामध्ये महावितरण कंपनीने नगरपालिका क्षेत्रासाठी 100 रुपये आकारणी भाडे प्रतिमहा करावा असे लिहिलेले असताना ग्रामपंचायत व ग्रामीण तक्त्यामध्ये 100 रुपये कर आकारणी करून मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आहे. त्यामुळे तीन महिन्याच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करण्यात यावीत. सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे वीज बिले भरणे शक्य नाही. महावितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी कोणत्याही परिस्थितीत वीज बिलाची वसुली करू नये अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, सातारा तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ, संजय जाधव, विजय चव्हाण, महादेव डोंगरे, रामचंद्र मोरे उपस्थित होते.