वाढदिवसानिमित्त अंदाजे 20 जणांकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला तिलांजली
स्थैर्य, सातारा, दि. 09 : वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकांच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठी प्रथम वृक्षारोपणाचा बनाव करुन झिंगाट दारुपार्टी केल्याचा प्रकार ठोसेघर (ता. सातारा) येथील वन विभागाच्या मालकीच्या न्याहरी निवासामध्ये रात्री घडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या 144 कलमाचा भंग करत वनपालाच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वनपालासह मित्रांनी झिंग झिंग झिंगाट होऊन उच्छाद केल्याने ठोसेघर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासकीय इमारतींचा गैरवापर करून सोशल डिस्टन्सला शासकीय कर्मचाऱ्यांनीच हरताळ फासला आहे.
ठोसेघर (ता. सातारा) येथे ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी यांचा समावेश असलेल्या ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना झाली आहे. ठोसेघर पर्यटन स्थळाचा विकास करण्याबरोबरच गावातील विकास कामे करण्याची जबाबदारी या समितीवर आहे. मार्च 2020 नंतर जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे जिह्यातील सर्वच पर्यटनस्थळे तात्पुरते बंद करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने दिली. यानुसार ठोसेघर येथील पर्यटनस्थळ बंद होते. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि समितीचे सदस्य तसेच तेथे काम करणारे कर्मचारी वगळता त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे ठोसेघर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने काटेकोरपणे पालन केले. सर्व काही आलबेल असतानाच ठोसेघर येथे कार्यरत असणाऱ्या वनपाल आणि वनरक्षकाच्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दुपारी 3.30 च्या सुमारास वनपाल वनरक्षकासह साधारण 12 ते 15 जण संयुक्त वनव्यवस्थापन समिती कार्यालय परिसरात दाखल झाले. नजिकच पर्यटकांना जेवण्यासाठी न्याहरी निवास आहे. संबंधितांनी ते न्याहरी निवास उघडण्याच्या सूचना तेथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केल्या. त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पिना काढण्यात आल्या. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या टोळक्याने सातारा येथूनच तयार जेवण आणले होते. सोबत दारूच्या बाटल्यांचा बॉक्सही होताच. सायंकाळी अंधार पडताच केक कापल्यानंतर रंगीत पार्टीला प्रारंभ झाला. ही पार्टी करीत असताना कोणीही मास्कचा, सोशल डिस्टन्स वापर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या 144 कलमाचा भंग झाला आहे.
काही वेळाने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काही युवकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यामुळे ही बाब तेथील काही सुज्ञ नागरिकांना समजली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता वन विभागाच्या न्याहरी निवासात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्यासमवेत आलेले सर्व झिंग झिंग झिंगाट झाल्याचे चित्र पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. जिह्यात तीन पेक्षा अधिक माणसांनी एकत्र न येण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत, तरी या सूचनांना हरताळ फासत वनविभागाचे कर्मचारी पार्टीमध्ये गुंग झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.