दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२१ । सातारा । वनविभाग सातारा, ड्रोंगो निसर्ग संशोधन, संवर्धन व संरक्षण संस्था तसेच महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ ते ८ ऑक्टोबर राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने मार्गदर्शनपर व्याख्याने व माहितीप्रद जंगल भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा शहरानजिक, प्रस्तावित महादरे फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्रात सप्ताहात दररोज सकाळी ८ ते १० या कालावधीत हे कार्यक्रम होतील. या शिबिराकरिता उपवनसंरक्षक महादेव मोहिते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सप्ताहात रोज वन्यजीवांमधील एक शाखा घेऊन त्यावर तज्ञ, मान्यवरांचे व्याख्यान व त्यानंतर त्यासंबंधी महादरे जंगल क्षेत्रात भ्रमंती असे कार्यक्रमाचे स्वरूप राहील. या निसर्ग शिबिर सप्ताहात फुलपाखरे, पतंग, कोळी व इतर किटक, साप-पाली-बेडूक यांसारखे सरपटणारे व उभयचर जीव, मासे तसेच बिबट, तरस, रानडुक्कर, भेकर व इतर वन्यप्राणी, पक्षीजीवन विविधता, वनस्पती विविधता, वन वणवा समस्या व त्यावरील उपाय योजना, मानव-वन्यजीव संघर्ष अशा विषयांवर सादरीकरण व प्रत्यक्ष क्षेत्रावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याकरिता डॉ. जितेंद्र कात्रे, डॉ. मिलिंद भाकरे, ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशनचे स्वप्निल पवार, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, गायत्री पवार, पूजा मिसाळ, श्वेता सुतार, प्रज्ञा मोहिते असे विविध विषयातील अभ्यासक, तज्ञ सादरीकरण व मार्गदर्शन करतील.
हा उपक्रम सर्व निसर्गप्रेमींसाठी खुला असून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तरी यामध्ये कोरोना साथरोग नियमांचे पालन करून सहभागी होण्याचे आवाहन साता-याचे वनक्षेत्रपाल डॉ. आर. बी. चव्हाण, ड्रोंगोचे अध्यक्ष सुधीर सुकाळे आणि मेरी च्या प्रा. नेहा बेंद्रे प्रा. प्रतिमा पवार यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता ९८२२०१४९३९/ ९४२१९९७३०१ वर संपर्क साधावा.