स्थैर्य, सोलापूर, दि.५: मुलांनो पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासा, असा प्रेमळ सल्ला देतानाच अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
निमित्त होते पक्षी सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचे. सिध्देश्वर वन विहाराच्या परिसरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चितमपल्ली उपस्थित होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिन मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील, विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने आदी उपस्थित होते.
श्री. चितमपल्ली म्हणाले, ‘पक्षी म्हणजे निसर्गाचे वैभव आहे. मुलांनी विविध छंद जोपासायला हवेत. त्यात पक्षी निरीक्षणाचा समावेश असावा. पक्षी निरीक्षणातून खूप काही शिकण्यासारखे आहे.’
श्री. म्हैसकर म्हणाले, ‘समाजात पक्ष्यांबाबत जाणीव जागृती व्हावी. पक्षी निरीक्षणाची मुलांना गोडी लागावी यासाठी राज्य शासनाने पक्षी सप्ताह आयोजित केला होता. या सप्ताहाचे सोलापुरात खूपच चांगले नियोजन झाले. सोलापुरात विविध प्रकारचे पक्षी आढळतात. सोलापूर पक्षी निरीक्षणासाठी उपयुक्त ठिकाण आहे.’
यावेळी पक्षी सप्ताहानिमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन संध्याराणी बंडगर, संजय भोईटे, लेखापाल नवनाथ भानवसे, सिध्देश्वर सगरे, सुधीर पाटील यांनी केले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे- निबंध स्पर्धा – पहिली ते पाचवी गट – रिद्धी राजकुमार पट्टणशेट्टी, दत्तप्रसन्न उत्तरेश्वर शिंदे, स्वरा सोमनाथ सिंदकर, मंजिरी अरविंद भोसले.
सहावी ते दहावी गट- साक्षी भागवत आवताडे, सार्थक अनिल यादव, अलसफा बशीर बागवान, धनश्री भास्कर पाटील.
खुला गट- रवींद्र जगन्नाथ साळुंखे, भारती काशिनाथ शिंदे, लक्ष्मण भागवत माळी, ज्योती विठ्ठल मोरे.
छायाचित्रण स्पर्धा- राहुल उंब्रजकर, संतोष धाकपाडे, स्वप्नील संभाजी जगताप, ऋतिक सुभाष आवटे.