
स्थैर्य, सातारा, दि. 30 सप्टेंबर : सज्जनगडावर जाण्यासाठी रामदास स्वामी संस्थानने रस्ता केला आहे. त्यापुढे केवळ दीडशे फूट रस्ता करण्यासाठी वन विभागाने परवानगी दिल्यास वृद्ध, महिलांना सुलभ होणार असून, संस्थान या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. वृद्धांचा त्रास कमी होण्यासाठी वन विभागाने लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे.
सज्जनगडावर जाण्यासाठी गडाच्या वरील पायथ्यापर्यंत रस्ता आहे. तेथपर्यंत सर्व वाहने जातात. त्यापुढे नागरिकांना गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत पायर्या चढाव्या लागतात. गडावरील श्रीराम मंदिर व समर्थांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पुण्या- मुंबईसह विविध राज्यांतून भाविक येतात. त्यामधील सर्वांनाच पायर्या चढून गडावर जावे लागते. मात्र, वृद्ध, महिलांना त्याचा त्रास होतो. काहीवेळा डोलीचा
आधार घ्यावा लागतो. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी रामदास स्वामी संस्थानने वरील वाहन तळानजीक जागा खरेदी करून पार्किंगची व्यवस्था केली आहे. तेथून पुढे संस्थानने सुमारे 800 मीटर रस्ता स्वतः तयार केला आहे. तो गडाच्या मुख्य दरवाजाच्या अलीकडे दीडशे फुटापर्यंत जातो. तेथून पुढे दरवाजापर्यंत वन विभागाची हद्द आहे. या हद्दीतून रस्ता करण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. रामदास स्वामी संस्थानने त्यासाठी वन विभागाकडे परवानगी मागितली आहे. वन विभागाने लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे.
दरम्यान, संस्थानच्या पार्किंगपासून पुढे 800 मीटर जो रस्ता संस्थानने केला आहे. तो पक्का करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. या रस्त्याला संरक्षक कठडे करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष भूषण स्वामी, ज्येष्ठ विश्वस्त बाळासाहेब स्वामी यांनी दिली.
सज्जनगडावर सर्व वयोगटातील भाविक येतात. त्यामध्ये महिला आणि ज्येष्ठांचे प्रमाणही लक्षणीय असते. त्यांना गडावर येणे जाणे सुलभ व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
– बाळासाहेब स्वामी, विश्वस्त,रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड.