दैनिक स्थैर्य । दि.११ मे २०२२ । सातारा । कुमठे तालुका सातारा येथे घोरपडीची शिकार करून त्यांचे मांस शिजवल्याप्रकरणी सातारा वनविभागाने फलटण तालुक्यातील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. भीमराव जयसिंग बनसोडे रा. आडगाव तालुका फलटण व अमर अशोक तरडे रा. मलवडी बिभवी अशी आरोपींची नावे आहेत. सातारा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या घटनेची माहिती अशी, दि. 9 मे रोजी कुमठे धनावडेवाडी या रस्त्यावर बनसोडे व तरडे हे घोरपडीसह जात असताना वनविभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. येथील दत्तात्रय चव्हाण यांच्या उसाच्या शेतात गावठी कुत्रे, लाकडी काठी व कुऱ्हाडीच्या साह्याने घोरपडीची शिकार केल्याची कबुली बनसोडे यांनी दिली. घोरपड अनुसूची विभाग 1 नुसार दुर्मिळ वन्य प्राणी असल्याने त्याचे मांस शिजविणे, अनधिकृतपणे बाळगणे, शिकार करणे वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 2 नुसार गुन्हा असून या प्रकरणातील मृत घोरपड जप्त करण्यात आली आहे. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 13 मे पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
या कारवाईमध्ये अरुण सोळंकी, कुषाल पावरा, महेश सोनवले, सुहास भोसले, राजकुमार मुसलकी, साधना राठोड, अश्विनी नरळे, मारुती माने यांनी भाग घेतला. वन्य संपदेची शिकार करणाऱ्यांची माहिती गोपनीयरित्या कळविण्याचे आवाहन डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांनी केले आहे.