दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । पुणे। अमेरिकेत गुप्तचर अधिकारी असल्याचे सांगून सातारच्या एका भामट्याने पुण्यातील उच्चशिक्षित तरुणीला तब्बल 10 लाखाला गंडा घातला. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी तोतया गुप्तचर अधिकार्याला बेड्या ठोकल्या आहेत. अमित चव्हाण (वय 30, पाटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत धायरी येथील एका 28 वर्षीय तरूणीने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फसवणूक झालेल्या मुलीने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. संशयित आरोपी अमित हा चाकण परिसरात तिच्या बरोबर राहण्यास होता. एप्रिल 2021 मध्ये अमित आणि तरूणीची बेटर हाफ या सोशल साईटवर भेट झाली. त्याने तिला अमेरिकेतील गुप्तचर विभागातील अधिकारी असल्याचे सांगून त्याच्यावर भारत, दुबई, अमेरिकेची जबाबदारी असून 154 देश हॅन्डल करत असल्याचे सांगितले. भारतात तपासासाठी आलो असल्याची थाप मारून त्याने तिला विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरूच होते. याच दरम्यान त्याने तिला लग्नाची मागणी घातली. यावेळी आरोपीने त्याची ओळख राहुल राजाराम पाटील अशी सांगितली. याच दरम्यान दोघे बाणेर येथे भेटले. तेथे त्याने तरूणीला तिचा मोबाईल मागितला. त्याच्यावर विश्वास ठेऊन तिनेही तिचा मोबाईल त्याला दिला. त्याने तिला माझ्यावर आणि तुझ्यावर रॉ (रिसर्च अनालिसीस टीम) नजर असल्याची भिती घातली. फिर्यादीला भिती दाखवून तरूणीला तिचा लॅपटॉप फॉरमॅट करण्यास सांगितला. विविध कारणे सांगून त्याने तिचे सिमकार्ड, एटीएमकार्डही ताब्यात घेतले. तिला त्याच्या मिहीर जैन या मित्राचे सुरत, गुजरात येथील टेक्सटाईल कंपनीतून कमी किंमतीत व लवकर मटेरीअल मिळवून देतो असे आमिष दाखविले. वारंवार तिला रॉची भिती दाखवून त्यांने तिच्या खात्यातून तब्बल 8 लाख 37 हजार रूपये ट्रान्सफर केले. तसेच तिचा अॅपल कंपनीचा 1 लाख 28 हजारांच्या लॅपटॉपचाही अपहार केला. अशी एकूण त्याने तरूणीकडे दहा लाख रूपये घेतले. याच दरम्यान, रॉ च्या अधिकार्यांपासून वाचण्यासाठी माझा मोबाईल एक महिना बंद असेल असे सांगितले. परंतु, एक महिन्यानंतरही त्याचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने पोलिस ठाणे गाठून त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ अटक करत त्याने केलेली तोतयेगिरी उघड केली.