स्थैर्य, फलटण, दि. 1 : आपल्या तालुक्यातील लोकांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने व लोक दक्षता घेत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव आपण रोखू शकलो आहोत. आता मुंबई व पुणे येथून आलेल्यांना सक्तीने गृह विलगीकरण करणे आवश्यक आहे. तालुक्याच्या सुरक्षिततेसाठी अशा नागरिकांनी स्वत:हून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र अशा लोकांपैकी जर कोणी प्रशासनाचे नियम मोडत असेल तर गावाने पुढाकार घेवून त्यांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरणासाठी फलटणला पाठवून द्यावे. कोरोनाची साखळी रोखण्यासाठी हे आवश्यक आहे, असे आवाहन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी राजुरी, ता.फलटण येथे ग्रामस्थांशी बोलताना केले.
राजुरी, ता. फलटण येथे करोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत श्रीमंत रघुनाथराजे मार्गदर्शन करत होते. यावेळी फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, डॉ.बाळासाहेब सांगळे, फलटण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयकुमार इंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चांगदेव खरात, मोहनराव निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, सरपंच सौ. कौशल्या साळुंखे, उपसरपंच भारत गावडे, ग्रामसेवक भाऊसाहेब कोकरे, पोलीस पाटील लक्ष्मण बागाव, भवानीनगरचे पोलीस पाटील पवार, डॉ. मोहन करणे, सोमनाथ गावडे, सचिन पवार, विजय गायकवाड, रमेश बागाव, राजेंद्र खुरंगे, नरेंद्र रणदिवे उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले की, सध्या कोरोनाच्या विळख्याने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. संपूर्ण भारतात हा कोरोना थैमान घालत असताना सुदैवाने फलटण तालुक्यातील परिस्थिती काही अंशी समाधानकारक आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मुंबई – पुणे आदी बाहेरगावांहून आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे सर्वांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या परिस्थितीत तालुक्यातील कोणीही आपण एकटे आहोत, असे समजू नका, मी व आमचे कुटुंबीय आपल्या सोबत कायम आहे व राहणार, असेही श्रीमंत रघुनाथराजे यांनी शेवटी सांगितले.
बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर म्हणाले, करोनाची साखळी तयार न होऊ देण्यासाठी गावात सर्वांनी सोशल डिस्टसिंग पाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, पोहायला जाणे टाळावे असे आवाहन करुन आता करोना बरोबर जगायला शिकले पाहिजे.
कोरोनाच्या परिस्थितीत बाजार समिती सुरू ठेवून शेतमालाला चांगला बाजारभाव मिळवून दिल्याबद्दल विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे उपस्थितांनी विशेष आभार मानले.
प्रास्ताविक व आभार फलटण तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष धनंजय पवार यांनी मानले.