
स्थैर्य, फलटण, दि. 12 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक १३ मधील संजीवराजेनगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्डेमय रस्ते, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, गटारांची दुरावस्था आणि ओढ्याचे खोलीकरण न होणे या समस्या कायमस्वरूपी डोकेदुखी ठरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या अपेक्षा आणि स्वाभिमानाला न्याय देण्यासाठी समाजसेवक मनोज शेडगे यांनी जनतेच्या आग्रहाखातर प्रभाग १३ मधून आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
संजीवराजेनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून विकासाची वानवा आहे. विशेषतः परिसरातील ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याची मागणी अनेकदा करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे पावसाळ्यात ओढ्याच्या पुराचे पाणी थेट नागरिकांच्या घराघरांत शिरते. येथील रहिवाशांना दरवर्षी या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असून, ते भयभीत अवस्थेत दिवस काढत आहेत.
मनोज शेडगे यांनी गेल्या काही वर्षांत स्थानिक पातळीवर विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ते समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधणारे आणि जनतेशी थेट संवाद साधणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे प्रभागातील नागरिकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
“जनतेचा स्वाभिमान, प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि पारदर्शक प्रशासनाला माझे सर्वोच्च प्राधान्य असेल,” असे मत मनोज शेडगे यांनी व्यक्त केले आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, स्थानिक उमेदवार म्हणून या समस्या सोडवण्यासाठी शेवटपर्यंत लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेडगे यांनी प्रभागातील समस्यांवर एक ठोस आराखडा तयार केला असल्याचे समजते. यामध्ये ओढ्याचे खोलीकरण करणे, पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करणे, गटार व्यवस्थेचे योग्य नियोजन करणे, स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी आणि रस्ते डांबरीकरण या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.
परिसरातील नित्यनवीन समस्यांमुळे नागरिकांचा संयम सुटत असताना, शेडगे यांच्या उमेदवारीमुळे विकासाची नवी आशा निर्माण झाली आहे. युवकवर्ग, महिला संघटना तसेच स्थानिक रहिवाशांकडून त्यांना सक्रिय पाठिंबा मिळत असून, त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक स्तरावर जनतेचा आवाज ठामपणे मांडत, सर्वांगीण विकासाच्या दिशेने काम करणारा उमेदवार म्हणून मनोज शेडगे यांची उमेदवारी ही केवळ निवडणूक नसून, संजीवराजेनगरच्या जनतेच्या स्वाभिमानाची लढाई ठरेल, अशी भावना प्रभागात व्यक्त होत आहे.

