दैनिक स्थैर्य | दि. ६ मे २०२३ | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी फलटण तालुका व माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामध्येच श्रीमंत संजीवराजे हे अकलूज येथे मोहिते-पाटील यांनी आयोजित केलेल्या ‘ताराराणी महिला महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय क्षेत्रात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतदेखील माढा लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत संजीवराजे हे प्रमुख दावेदार समजले जात होते. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ही उमेदवारी संजय शिंदे यांना दिली. त्यामुळे राष्ट्रवादीचा ‘बालेकिल्ला’ मानल्या जाणार्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे लोकसभेचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात जर निवडणूक लढवायची असेल तर ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे ठरते. त्यामुळे विजयसिंह मोहिते – पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्रीमंत संजीवराजे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.