जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्वसाधारण सभा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 12 : जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सवर सर्वसाधारण सभा पार पडली. आपापल्या पंचायत समितीत बसून सदस्यांनी जिल्हा परिषदेत पदाधिकार्‍यांशी व अधिकार्‍यांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाच्या साथीत ग्राउंड लेव्हलवर काम करणार्‍या अंगणवाडी सेविका आणि आशा यांना पीपीई किट देण्याची जोरदार मागणी केली. यासह अनेक विषयांवर चर्चा झाली व अजेंड्यावरील सर्व विषय मंजूर झाले.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सींगच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेची सभा व्हिडिओ कॉन्फरन्सवर झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले होते. उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्यास सर्व विभागांचे सभापती व अधिकारी जिल्हा परिषदेत होते तर जिल्हा परिषद सदस्य आपापल्या तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये होते. सभेच्या सुरुवातीलाच आवाजात व्यत्यय येत असल्याने पुढील वेळी या त्रुटी दूर करण्याची मागणी संजीवराजे व अन्य सदस्यांनी केली.

सभेमध्ये मल्हारपेठ सदस्य यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कोरोनाच्या संकटकाळात ग्राउंड लेव्हला काम करत आहेत. धोका पत्करून त्या घरोघरी जावून सर्व्हे करत असतात. अनेक ठिकाणी कंटेंटमेंट झोन असूनही त्याठिकाणी त्यांना जावे लागते. यामुळे त्यांना पीपीई किट द्यावे, अशी मागणी केली. इतर सदस्यांना हा मुद्दा उचलून धरला.

सदस्य भिमराव पाटील यांनी दुष्काळी तालुक्यातील अनुदानाचं काय झालं असा सवाल विचारला. त्यावर अध्यक्ष कबुले यांनी याबाबतची बिले जमा झाल्यानंतर 15 दिवसांत जमा करू, असे सांगितले. त्यावर बिले जमा झाली असल्याचे सांगतल्यानंतर याबाबत माहिती घेवून अनुदान जमा झाल्याचे सांगण्यात आले.

सदस्य बापुसो जाधव यांनी पाटण तालुक्यात भात व सोयाबीनचे बियाणे झेडपीच्या वतीने पंचायत समितीच्या माध्यमातून वाटप होते, मात्र, याबाबत जि. प. सदस्यांना विश्‍वासात घेतले जात नाही. आतापर्यंत किती बियाणे आले आणि किती वाटप झाले, याची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच जि. प. सदस्यांना विश्‍वासात न घेणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावर कृषी  सभापती मंगेश धुमाळ यांनी व कृषी अधिकारी पाटण तालुक्यात देण्यात आलेल्या बियाणांची माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील प्रतापसिंह हायस्कूलसंदर्भात ही शाळा हस्तांतरित होणार नाही, चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे कबुले म्हणाले.

ग्रामपंचायतीला संगणक पुरवणारी कंपनी अवास्तव रक्कम आकारत आहे. त्यामुळे ज्या त्या ग्रामपंचायतीला संगणक सेवा घेण्याबाबत अधिकार द्यावेत, अशी मागणी पाटण तालुक्यातील सदस्यांनी केली.

लोणंदला शाळा खोल्यांसाठी जिल्हापरिषदेमार्फत निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, लोणंद आता नगरपंचायत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतून निधी देण्याऐवजी नगरविकास खात्याच्या माध्यमातून या शाळा खोल्यांसाठी निधी देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.

विषय पत्रिकेवरील विषयांचे तसेच ऐनवेळच्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर तालुकानिहाय सर्व सदस्य व पंचायत समिती सभापतींशी विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.

सदस्य धैर्यशील अनपट आणि अर्चना देशमुख यांनी अनुकंपा तत्त्वावरील भरतीचा मुद्दा मांडला. अनुकंपा तत्त्वावरील निकषांची पुन्हा पडताळणी करावी. यावेळी या भरतीत कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही कबुले यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!