भारतीय रेल्वेकडून प्रथमच ‘बॅग्स ऑन व्हील’ सेवा



स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२३: भारतीय रेल्वे पहिल्यांदाच बॅग्स ऑन व्हील ही सेवा देण्याची तयारी करत आहे. उत्तर रेल्वेच्या दिल्ली मंडळाच्या रेल्वे प्रवाशांसाठी अ‍ॅप आधारित बॅग्स ऑन व्हील सेवा सुरु करण्यात आली आहे. विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजीव चौधरी यांनी सांगितले की, रेल्वे महसूल वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. यानुसार दिल्ली विभागामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सामान त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. ही अशाप्रकारची पहिलीच सेवा आहे. 

बीओडबल्यू (‘बॅग्स ऑन व्हील’) अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयफोनवरही वापरता येणार आहे. या अ‍ॅपवरून रेल्वे प्रवासी त्यांच्या घरातून रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वे स्थानकावरून त्यांच्या घरापर्यंत बॅगा किंवा सामान पोहोचविण्याचे काम होणार आहे. यासाठी प्रवाशांना त्यांचा बुकिंगनुसार कोच क्रमांक, सीट क्रमांक आणि घराचा पत्ता द्यावा लागणार आहे. रेल्वेने निवडलेला ठेकेदार प्रवाशांचे सामान सुरक्षितपणे त्या ठिकाणी नेऊन देणार आहे. म्हणजेच या अ‍ॅपवर बुकिंग केल्यास प्रवाशांना रिकाम्या हातांनीच रेल्वे स्थानक किंवा घरी जायचे आहे. बॅगा उचलून टॅक्सीत टाकणे किंवा सांभाळण्याची कटकट वाचणार आहे. 

रेल्वे यासाठी कमी पैसे आकारणार आहे. कमी शुल्क घेऊन डोअर-टू-डोअर सेवा उपलब्ध केली जाणार आहे. प्रवाशाच्या घरातून त्याचे समान रेल्वे कोच तसेच रेल्वे कोचमधून प्रवाशाचे सामान त्याच्या घरी पोहोच केले जाणार आहे. या योजनेचा फायदा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि एकट्याने प्रवास करणा-या महिलांना होणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!