अजिंक्यतार्‍या किल्ल्याच्या राजसदरेवर प्रथमच सातारा पालिकेची विशेष सभा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि १३: सातारा पालिकेच्या इतिहासात प्रथमच पालिकेची विशेष सभा सोमवारी ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर घेण्यात आली. अजिंक्यतारा किल्यावरील इमारती आणि वास्तूंच्या विकसनाचा ठराव स्वाभिमान दिनानिमित्ताने एकमताने मंजूर करण्यात आला.
ज्या राजसदरेवर ऐतिहासिक निर्णयांची नांदी झाली त्याच अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर मंगळवारी सातारा पालिकेची विशेष सभा दिमाखात पार पडली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या किल्ल्याच्या संवर्धनाचा विकास आराखडा तयार करून तो नगरविकास विभागाकडे पाठवण्याचा ठराव पाठवण्यात येईल, अशी माहिती सातारा विकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी देत हा ठराव एकमताने मंजूर करण्याची विनंती केली.
छत्रपती शाहू महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून सातारा शहराची स्थापना केली. दि. 12 जानेवारी रोजी त्यांचा किल्ले अजिंक्यतार्‍यावर राज्याभिषेक झाला होता. शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी हा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सातारा पालिकेची प्रथमच अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर मंगळवारी सकाळी अकरा वाजता विशेष सभा पार पडली.
सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह सर्व सभापती व नगरसेवकांनी अभिवादन केले. यानंतर सभेला सुरुवात झाली.
सभाअधीक्षक हिमाली कुलकर्णी यांनी अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनाचा विषय सभेपुढे मांडला. यावर स्वीकृत नगरसेवक अ‍ॅड. दत्तात्रय बनकर म्हणाले, सातारा पालिकेने प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार केला. तसाच आराखडा किल्ले अजिंक्यतार्‍याच्या संवर्धनासाठी देखील तयार केला जाईल. या किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याबरोबरच येथील तळी, मंदिरे, यांचे देखील संवर्धन केले जाईल. हा किल्ला पूर्वी पालिका हद्दीत नसल्याने विकासासाठी अनेक अडचणी येत होत्या. मात्र हद्दवाढीने ही अडचणी आता दूर झाली आहे. त्यामुळे किल्ल्याचा विकास आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे सादर केला जाईल. अर्थसंकल्पातही किल्ल्यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाईल.
नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी किल्ल्याचे संवर्धन करीत असतानाच येथील स्ट्रीट लाईटचा प्रश्‍न प्राधान्याने मार्गी लावावा, अशी मागणी केली. तर विकास कामे करावयाची झाल्यास सर्वप्रथम रस्त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे. त्यामुळे अजिंक्यतारा किल्ल्याकडे येणार्‍या उर्वरित रस्त्याचे काम गतीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब ढेकणे यांनी व्यक्त केली. नगरसेवक निशांत पाटील म्हणाले, सातार्‍याला अजिंक्यतारा किल्ल्यामुळे ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. या किल्ल्याचा विकास व्हावा ही सर्वांचीच भावना आहे. अंतर्गत मतभेद विसरून आपण सर्व नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे किल्ल्याच्या संवर्धनासाठी पाठपुरावा करू. ते नक्कीच किल्ल्यासाठी भरघोस निधीची तरतूद करतील. यानंतर किल्ल्याच्या विकास आराखड्याचा  ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी बांधकाम सभापती सिद्धी पवार, नियोजन सभापती स्नेहा नलवडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, नगरसेवक किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, राजू भोसले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!