दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२१ | खंडाळा | खंडाळा साखर कारखाना निवडणूकीत सभासदांनी दिलेला कौल मनापासून स्विकारला आहे . परिवर्तनाला लोकांनी साथ दिली यामागे कारखाना सुरू होण्याची अपेक्षा होती . नवीन संचालक मंडळाने वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांचे हित जोपासावे . विद्यमान आमदारांनी पुढाकार घेऊन पंधरा दिवसात कारखाना सुरू करावा आमची सहकार्याची भूमिका राहिल असे स्पष्ट मत किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्त केले .
खंडाळा येथील साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी अध्यक्ष शंकरराव गाढवे , उपाध्यक्ष गजानन बाबर , राहुल घाडगे , रतनसिंह शिंदे , चंद्रकांत हिंगवणे , प्रताप यादव , अनिरुद्ध गाढवे , चंद्रकांत यादव , धनाजी डेरे , बापूराव धायगुडे , बंडू राऊत , हर्षवर्धन शेळके , अतुल पवार , इंदूमती पाटील , अनिता भोसले , विशाल धायगुडे यांसह किसनवीर व खंडाळा कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते .
मदन भोसले पुढे म्हणाले , कारखाना उभा करताना किसनवीरने केवळ कर्तव्य भावनेतून सहभाग घेतला . निर्धारीत वेळेत तो उभा रहावा यासाठी समप्रमाणात भागभांडवल घालून करार केला . कारखाना उभा करून तो चालवला . त्यावेळी विरोधक कधीही योगदानासाठी पुढे आले नाहीत . गेले दोन वर्ष तो चालवताना अडचणी आल्या , उशीरा कारखाना सुरू झाल्याने कार्यक्षेत्रातील ऊस संपला होता . तरीही उर्वरित गाळप केले होते. त्याचा एफआरपी प्रमाणे शेतकरर्यांची देणी दिली आहेत . चालू वर्षाचा गाळप परवाना प्रस्ताव दाखल केला आहे . आठच दिवसात तो मिळू शकतो . करार मोडीत काढण्याची भाषा करण्यापेक्षा तुमचे जबाबदार लोक प्रस्ताव घेऊन पाठवा . ज्या अडचणी वाटतात त्या चोवीस तासात मार्गी लावण्यासाठी सहकार्य करू . कारखान्याच्या अडचणी बाबत त्यांच्या नेतृत्वाने सरकार दरबारी आवाज उठवावा . राज्य सरकार त्यांच्या विचारांचे आहे . करार दुरूस्त करून सर्व अधिकार तुम्हाला देण्याची आमची तयारी आहे . पण कारखाना सुरू करण्यास विलंब करू नये . या कारखान्याचे व्यवस्थापन आमच्याकडे आहे मात्र आमची सहकार्याची भूमिका राहील त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष दयावे . कारखाना उभारणीसाठी ज्या संचालकांनी स्वतःच्या जमिनीवर कर्ज काढून पैसे दिले त्यांचे योगदान विसरून चालणार नाही त्यांना वाऱ्यावर सोडू नका .
॥ निवडणूका जिंकणं सोपं पण …
सहकारात निवडणूका जिंकणं आणि प्रत्यक्ष संस्था चालविणे यामध्ये खूप मोठा फरक आहे . आमदारांनी निवडणूक जिंकली त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे . राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री , सहकारमंत्री यांचेशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध आहेत . त्यामुळे त्यांनी कारखाना लगेच सुरु करून लोकांच्या भावना जपाव्यात . कामगारांना न्याय दयावा . ज्यांनी उभारणीसाठी योगदान दिले नाही त्यांनी लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करू नये .॥