दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२१ । सातारा । अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीची संपूर्ण रक्कम अदा करून गाळपास आलेल्या ऊसाचे संपूर्ण पेमेंट वेळेत अदा केले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागला. याबद्दल आरळे ग्रामस्थांनी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार करून संचालक मंडळाचे आभार मानले.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने नुकत्याच संपन्न झालेल्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन ३०४५ रूपये (एफआरपी) उच्चांकी दर दिला. तसेच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम वेळेत अदा केली. शेतकऱ्यांचे हित जोपासून ऊसबिल वेळेत अदा केले आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत मोलाचा आधार दिला याबद्दल सातारा तालुक्यातील आरळे येथील ग्रामस्थांनी तकऱ्यांच्या वतीने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार करून आभार मानले. यावेळी नंदकुमार वाघमळे, सयाजी कदम, संभाजी कदम, अमोल कदम, अजित कदम, साईराज कदम, रवींद्र जडे आदी उपस्थित होते.